ज्युनियर आशिया चषक हॉकी : मलेशियावर 2-1 ने मात
वृत्तसंस्था/ काकामीहारा (जपान)
येथे सुरु असलेल्या कनिष्ठ महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांनी आपला विजयी धडाका कायम ठेवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने मलेशियाला 2-1 असे नमवले. या विजयासह भारतीय संघ अ गटात अव्वलस्थानी पोहोचला आहे. आता, भारताची पुढील लढत दक्षिण कोरियाविरुद्ध होईल.
सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 22-0 असा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय महिलांनी मलेशियाविरुद्ध देखील आक्रमक खेळ केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण गोल नोंदवण्यात मात्र त्यांना अपयश आले. यानंतर मलेशियाच्या डियाने सहाव्या मिनिटाला शानदार गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. पण मलेशियाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दहाव्या मिनिटाला मुमताज खानने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात दीपिकाने 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला 2-1 असे आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत भारताकडे ही आघाडी कायम होती. तिसऱ्या व चौथ्या सत्रात भारतीय संघाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण या दोन गोल करण्याच्या संधीही वाया गेल्या. मलेशियाने देखील बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेरीस भारतीय महिलांनी 2-1 असा विजय मिळवत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली.