न्यायालयात लवकरच रचला जाणार इतिहास
आगामी काळ हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे असणार याचे संकेत मिळू लागले आहेत. तंत्रज्ञानाचे क्षेत्र आता जगभरातील लोकांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. याचनुसार आता लवकरच आणखी एक इतिहास रचला जाणार आहे. जगातील पहिला रोबोट वकील न्यायालयात दिसून येणार असून लोकांची बाजू न्यायाधीशांसमोर मांडणार आहे.
ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच ‘रोबोट वकील’ फेब्रुवारीमध्ये स्वतःचा पहिला खटला लढविणार आहे. हा जगातील सर्वात पहिला रोबोट वकील असून तो न्यायालयात युक्तिवाद करणार आहे. हा रोबोट वकील न्यायालयात एका खटल्याप्रकरणी पक्षकाराची बाजू मांडणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर हा रोबोट काम करतो. प्रत्यक्ष वेळेत न्यायालयातील युक्तिवाद ऐकून पक्षकाराला स्वतःचा सल्ला तो देणार आहे.
डू नॉट पे स्टार्टअपची निर्मिती
या रोबोटची निर्मिती काही वर्षांपूर्वी डू नॉट पे नावाच्या स्टार्टअपने केली होती. या स्टार्टअपचे मालक जोशुआ ब्राउडर आहेत. पूर्वी हा रोबोट ग्राहकांना केवळ लेट फीज आणि दंडाबद्दल सांगायचा, परंतु आता हा रोबोट खटला लढविण्यास देखील सक्षम झाला आहे. हा जगातील पहिला रोबोट वकील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अधिक माहिती देणे टाळले
सत्यावर टिकून राहण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला प्रशिक्षित करण्यात आल्याचे डू नॉट पेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाशुआ ब्राउनर यांनी म्हटले आहे. हा रोबोट आता कशाप्रकारे युक्तिवाद मांडणार आणि त्याला पुढील काळात अनुमती मिळाल्यास तो काय काय करू शकतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. खासगीत्वाच्या कारणांमुळे या रोबोटविषयी अधिक माहिती देणे टाळण्यात आले आहे.
जज रोबोटचा प्रकल्प
जगातील पहिल्या जज रोबोटच्या प्रकल्पाचे परीक्षण सुरू झाले आहे. युरोपच्या एंटोनियाने एक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स पॉवर्ड रोबो-जज तयार केला आहे. येथे रोबोटने न्यायाधीशाच्या स्वरुपात काम करण्यास सुरुवात केली होती. चीनमध्ये देखील अशाच प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. भारतातही या दिशेने काही पावले उचलली गेली आहेत.