पिरवाडीत भरदुपारी घरफोडीची घटना, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
पिरवाडी गोरखपूर येथे भरदुपारी ठेकेदाराच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरटय़ांनी पाच लाखांचे दागिने लंपास केले आहे. या चोरटय़ांविरूद्ध ठेकेदार गणेश प्रकाश पवार(वय 34) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिरवाडीतील शिवप्रभा रेसिडेन्सी मध्ये गणेश पवार यांचा फ्लॅट आहे. गणेश व त्यांच्या पत्नी दोघेही ठेकेदार आहेत. नेहमीप्रमाणे ते गुरूवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. याच वेळी दुपारी अज्ञात चोरटय़ाने त्यांचा बंद फ्लॅट फोडून आता प्रवेश केला. यावेळी घरातील साहित्य अस्थाव्यस्थ करून कपाटात ठेवलेले पाच लाखांचे दागिने चोरून नेले. संध्याकाळी घरी आल्यावर पवार दाम्प्त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.