दीर्घकाळानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतेय अभिनेत्री
दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका दीर्घकाळानंतर चित्रपट ‘श्री’द्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. ज्योतिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वतःच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्योतिकाने एक छायाचित्र शेअर केले असून यात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव, दिग्दर्शक तुषार आणि निर्माती निधी परमार दिसून येत आहे. ज्योतिकाच्या या नव्या इनिंगबद्दल तिचा पती सुपरस्टार सूर्याने शुभेच्छा दिल्या आहेत.
‘श्री’साठी माझ्या हिस्स्यातील चित्रिकरण पूर्ण केले आहे. या विशेष चित्रपटात स्थान दिल्याबद्दल निर्माती तसेच दिग्दर्शकाचे आभार मानते. राजकुमार रावची मी मोठी चाहती आहे. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी मोठी बाब आहे. राजकुमार हा बॉलिवूडमधील उत्तम कलाकारांपैकी एक आहे. त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळाल्याचे ज्योतिकाने नमूद केले आहे.
हा चित्रपट सर्वांची मने जिंकेल अशी अपेक्षा असल्याचे सूर्याने शुभेच्छा देत म्हटले आहे. ज्योतिकाने स्वतःचे बॉलिवूड पदार्पण 1997 मध्ये ‘डोली सजा के रखना’ या चित्रपटाद्वारे केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते.
‘श्री’ या चित्रपटाची कहाणी दृष्टीहीन उद्योजक श्रीकांत भोला यांच्या जीवनावर आधारित आहे. राजकुमार राव आणि ज्योतिका यांच्यासह या चित्रपटात अलाया फर्निचरवाला तसेच शरद केळकर मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहेत. ज्योतिका लवकरच मल्याळी चित्रपट ‘काथल ः द कोर’मध्ये दिसून येणार आहे, या चित्रपटात तिच्यासोबत मेगास्टार ममूती मुख्य भूमिकेत आहेत.