ग्रामस्थांत खळबळ; वनविभागाची दिवसरात्र शोधमोहीम
वार्ताहर/ वहागाव
कृष्णा नदीत टेंभू येथे मगरीचे दर्शन झाल्यानंतर रविवारी रात्री खोडशी (ता. कराड) येथे गावातील मुख्य चौकात रस्त्यावर मगर दिसल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कृष्णा नदीला खोडशी गावचा ओढा मिळतो. नदीतून ही मगर ओढय़ातून गावच्या मुख्य चौकापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे वनविभाग सतर्क झालेला असून दिवसरात्र शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
महामार्गाकडून खोडशी गावाकडे जाताना मुख्य रस्त्यालगतमध्ये मोठा ओढा आहे. हा ओढा कृष्णा नदीला मिळतो. ही मगर कृष्णा नदीतून ओढय़ामार्गे गावामध्ये मुख्य रस्त्यावर आली. खोडशी येथील कृष्णा डेअरीच्या समोर ही मगर आली. रात्री नऊ वाचता दुचाकीच्या प्रकाशात ही मगर गावकऱयांच्या निदर्शनास आली. त्यांनी आजूबाजूला ही बातमी सांगताच घटनास्थळी ग्रामस्थांनी जमून वन खाते, कराड पोलीस स्टेशनला कळवले. मगर पुन्हा मुख्य चौकातून ओढय़ामध्ये गेली. सोमवारी वन खात्याने मगर पकडण्याचा प्रयत्न सुरू केले, अद्याप त्यांना यश आले नाही.
गावच्या मुख्य चौकात मगर आल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने ही घटना गांभीर्याने घेत रात्रीपासूनच शोधमोहीम सुरू केली. तथापि रस्त्यावर आलेली मगर पुन्हा ओढय़ात गेली आहे. या परिसरात हत्ती गवत जास्त असून त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत आहेत. तरीही गावात वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
कृष्णाकाठी भीतीचे वातावरण
टेंभूत आढळलेल्या मगरीपेक्षा मोठी खोडशी येथे आढळलेली मगर ही पूर्ण वाढ झालेली आहे. ही मगर टेंभू येथील मगरीपेक्षा मोठी असल्याचे वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी सांगितले. दरम्यान, गावात सतर्कतचे इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीत एका आठवडय़ात दोन ठिकाणी मगरीचे दर्शन झाल्याने कृष्णाकाठी भीतीचे वातावरण आहे.