किरण कांदोळकरही राजीनामा देण्याच्या तयारीत : तृणमूल राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना करणार
प्रतिनिधी /पणजी
निवडणुकीत पूर्णतः सफाया झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाला आता घरघर लागली असून प्रदेश अध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या पत्नी व थिवीतील तृणमूलच्या उमेदवार ठरलेल्या कविता कांदोळकर यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांचे पती किरण कांदोळकर हे देखील राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसने गोव्यात पक्षाच्या संपूर्ण राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना करणार असे जाहीर केले असून प्रदेशाध्यक्षपदाची माळ लुईझिन फालेरो यांच्याच गळ्य़ात पडण्याची शक्यता आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नाही त्याचबरोबर फार मोठय़ा प्रमाणातही या पक्षाने मते मिळविलेली नसल्याने पक्ष नेतृत्वाला आलेल्या अपयशानंतर पक्षाने राष्ट्रीय पातळीवरुन गोव्यातील पक्षसंघटनेची पूर्णतः पुनर्रचना केली जाईल असे जाहीर केले.
प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर हे देखील आता या पक्षात राहाण्यास फारसे इच्छूक नाहीत. त्यांच्या पत्नी कविता कांदोळकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत काही पंच सदस्य मंडळीनी देखील तृणमूल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष कार्यालयात सादर केला आहे. सध्या तरी या पक्षाकडे जाऊन पद स्वीकारण्याच्या तयारीत राज्यात कोणीही नाही. त्यामुळे प्रदेश अध्यक्षपदाची माळ ही राज्यसभा सदस्य लुईझिन फालेरो यांच्या गळ्य़ात पडण्याची शक्यता वाढली आहे.
प्रशांत किशोर, आयपॅकने बिले दिली नाही : कविता
राजीनामा सादर केल्यानंतर कविता कांदोळकर यांनी सांगितले की कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की, आपण पक्षाचा राजीनामा द्यावा. कारण ज्याप्रमाणे तृणमूलने कार्यकर्त्यांना स्वीकार करायला पाहिजे होते तसे केले नाही. दुसरे कारण म्हणजे प्रशांत किशोर व आयपॅकने लोकांची विविध खर्चाची बिले होते ती दिली नाही. आणि कार्यकर्ते आमच्या घरी येऊन बसू लागले. असे आम्ही कधी केले नाहीत. कार्यकर्त्यांचा निर्णय मान्य करून आणि प्रशांत किशोरवर नाराजी व्यक्त करून आपण हा पक्ष सोडला आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष किंवा ममता बॅनर्जी यांच्यावर आम्ही नाराज नाहीत, असेही त्यां म्हणाल्या.