पंतप्रधानांच्या पदवीशी संबंधित मानहानी प्रकरण, 13 जुलैला पुन्हा पाचारण
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीशी संबंधित एका प्रकरणात बुधवारी अहमदाबाद न्यायालयात सुनावणी झाली. मात्र यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह हे दोघेही न्यायालयात पोहोचले नाहीत. त्यांच्या वकिलांनी हजेरीतून सूट मिळण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मान्य करत आता अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयेश चौटिया यांनी दोघांनाही 13 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.
गुजरात विद्यापीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह या दोन्ही नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. केजरीवाल आणि संजय सिंह यांनी सातत्याने संस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे विद्यापीठाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. पंतप्रधानांची पदवी आधीच वेबसाईटवर अपलोड केली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या पदवीशी संबंधित या प्रकरणात दोघांवर विद्यापीठाची प्रतिमा डागाळण्यासंबंधी वक्तव्य केल्याचा आरोप आहे. 23 मे रोजीही याप्रकरणी अरविंद केजरीवाल आणि आपचे खासदार संजय सिंह न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना नव्याने समन्स बजावून 7 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.