इमारतीला बेकायदा निवासी दाखला दिल्याचा दावा : बाजारातील पत्र्यांच्या गाळय़ांवर जोरदार चर्चा : इमारतींमध्ये पार्किंगसाठी जागा ठेवत नसल्याने नगरसेवक आक्रमक
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली शहरातील दीनदयाळ भवनासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच सदर इमारतीला बेकायदा निवासी दाखला दिल्याने शुक्र. दि. 23 रोजीच्या डिचोली पालिका बैठकीत बराच गदारोळ झाला. तसेच त्याच बिल्डरच्या गावकरवाडा येथील अन्य एका इमारतीत बेकायदा फ्लॅट वाढविले आहेत. डिचोली बाजारातील पत्र्यांचे गाळय़ांमधील बेकायदा सामान व ते जमीनदोस्त करण्याचा विषय गाजला. तसेच शहरात इमारती उभारताना रस्त्याच्या बाजूने पार्किंगसाठी जागा ठेवली जात नसल्याचाही विषय बराच गाजला. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली.
डिचोली शहरातील दीनदयाळ भवन समोर काम सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी असून इमारतीच्या मजल्यांनुसार पार्किंग सोडण्यात आलेली नाही. या इमारतीचे काम अजूनही सुरू असताना या इमारतीला पालिकेतर्फे निवासी दाखला देण्यात आला आहे. या विषयावर पालिका बैठकीत बरीच चर्चा झाली. सदर इमारतीला पालिकेने कोणत्या आधारावर निवासी दाखला दिला ? असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी केला. या इमारतीसाठी नगरपालिकेत सादर करण्यात आलेली कागदपत्रे योग्य तसेच नियमांप्रमाणे नसून साधी नोटरीही करण्यात आलेली नाही.
या विषयावर उत्तर देताना नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी, निवासी दाखला देण्यापूर्वी सदर इमारतीची ‘ब’ फाईल आपल्याकडे आलीच नसून परस्परपणे दाखला देण्यात आला आहे. यासाठी नगरसेवकांनी पालिकेच्या तांत्रिक विभागाला दोषी धरून धारेवर धरले. तसेच पालिका मंडळाने पाहणी न करताच सदर निवासी दाखला दिला कसा? यावर सर्वांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. तर सदर दाखला तत्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. परंतु सदर दाखला मागे घेण्यापूर्वी काही तांत्रिक बाबी तपासून सदर निवासी दाखला ‘पोस्ट ऍक्युपन्सी ऑडिट’ साठी पाठविण्यात यावा. त्यावर संबंधित अधिकाऱयांकडून सखोल चौकशी करून नंतर सदर निवासी दाखला मागे घेण्यात यावा की तो कायम ठेवण्यात यावा ते ठरविण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला. यावर नगराध्यक्ष आपले निरिक्षण नोंदविणार आहेत, असे ठरविण्यात आले.
या इमारतीबरोबरच याच बिल्डरची गावकरवाडा येथे एक इमारत असून त्यामुळे निवासी दाखला दिल्यानंतर सदर इमारतीतील फ्लेटची संख्या बेकायदेशीररित्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीच्या सेप्टिक व सोकपीट टाकीतील मलमिश्रीत घाण रस्त्यावर, गटरांमध्ये सोडले जाते. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरते याही इमारतीवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्र्यांच्या गाळय़ांवरून बराच गोंधळ, आरोप-प्रत्यारोप
डिचोली बाजारातील पत्र्यांच्या गाळय़ांमध्ये विनापरवानगी सामान ठेवल्याचा विषय बराच गाजला. तसेच त्यावर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये बरीच जुंपली. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. नगरसेविका दीपा शिरगावकर यांनी याविषयी नगराध्यक्षांना प्रश्न केला. यावर बरीच खडाजंगी झाली. या विषयावरून कचऱयाचा विषय निर्माण झाला. कचरा बाजारात का पडून राहिला यावर पुन्हा नगराध्यक्ष आणि नगरसेविकेमध्ये जुंपली. अखेर हा विषय पालिकेच्या तांत्रिक विभागावर आला. पालिका बाजार निरीक्षक, कनि÷ अभियंता यांच्या बेफिकीरपणामुळे सदर कचरा पडून राहिल्याचे उत्तर देण्यात आले. तर पत्र्यांच्या गाळय़ावरील विषयावर ते लगेच जमिनदोस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पडदा पडला.
नवीन इमारतीसाठी स्वतःची पार्किंगची जागा आवश्यक
डिचोली शहरात उभारण्यात येणाऱया इमारतींच्या मालकांकडून रस्यांच्या बाजूला नियमांत राखण्यात येणारा सेटबॅक व पार्किंगसाठी जागा न सोडता त्यावर अतिक्रमण केले जात आहे. इमारतीचे मालक सदर सेटबॅकवर रेलींग घालून त्यावर अतिक्रमण करतात. त्यामुळे इमारतीतील दुकानमालक आणि ग्राहक वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. डिचोली बसस्थानकाच्या मागे असलेल्या दोन इमारतीसमोरील सेटबॅकवर अतिक्रमण करण्यात आले असल्याचा विषय नगरसेवक रियाज बेग यांनी बैठकीत मांडला. सदर प्रकरण सध्या पालिकेत सुनावणीसाठी असून त्यावर सुनावणी होऊन लगेच निर्णय घेतला जाणार व योग्य ती कारवाई केली जाणार, असे उत्तर मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी दिले.
डिचोली शहरात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत विद्युत वाहिन्या, कचरा व्यवस्थापन, विविध विकास प्रकल्प, प्रत्येक प्रभागांमधील बेकायदा बांधकामे व त्यावरील कारवाई, कचरा प्रक्रिया प्रकल्प, रस्ते, गटरे व इतर विषयांवर या बैठकीत चर्चा झाली व निर्णय ठरावही घेण्यात आला. ही बैठक संध्या. 3.30 वा. सुरू झाली होती. तर ती रात्री उशिरापर्यंत चालूच होती.
या बैठकीला नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्षा सुखदा तेली, आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर, दीपा पळ, दीपा शिरगावकर, तनुजा गावकर, गुंजन कोरगावकर, रियाझ बेग, नीलेश टोपले, ऍड. रंजना वायंगणकर, ऍड. अपर्णा फोगेरी, सुदन गोवेकर, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, पालिका अभियंता आशिक खान, पालिका बाजार निरीक्षक, कनि÷ अभियंता यांची उपस्थिती होती.