उद्यापासून पाच दिवस जागृती दौरे करणार, तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येथील समितीच्या संपर्क कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. सचिव सिताराम बेडरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले. अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी मुंबई आंदोलनाची सविस्तर माहिती यावेळी कार्यकर्त्यांना दिली. बैठकीत कार्यकारिणी लवकरात लवकर निवडण्यात यावी, तसेच जागृती दौरे घेऊन समितीसाठी वातावरणाची निर्मिती करावी, चार जिल्हा पंचायत क्षेत्रात त्या त्या विभागाचे समितीचे मेळावे घेण्यात यावेत, अशा सूचना यावेळी कार्यकर्त्यांनी मांडल्या. तसेच समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावण्यात यावे, असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला.
या सर्वांचा विचार करून समितीचे कार्याध्यक्ष यशवंतराव बिरजे यांनी मंगळवार दि. 7 मार्च रोजी गुंजी माउलीला गाऱ्हाणे घालून लोंढा जिल्हा पंचायत मतदार क्षेत्रात जागृती दौरा सुरू करण्यात येईल. त्यानंतर नंदगड, जांबोटी, गर्लगुंजी या जिल्हा पंचायत क्षेत्रात दौरे करून शनिवार दि. 11 मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. या कार्यकारिणीत समितीशी एकनिष्ठ असलेल्यांचा गांभीर्याने विचार करून समाविष्ठ करण्यात येणार आहे. कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर गुढीपाडव्यापासून तालुक्यात समितीचे प्रचार दौरे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच म. ए. समिती संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही लवकरात लवकर करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील कोणते नेते उपलब्ध असतील त्यांना बोलावून तालुकास्तरीय मेळावा घेऊन कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे यशवंत बिरजे यांनी सांगितले. या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील, अॅड. अरुण सरदेसाई, महेश देसाई, केशव कळळेकर, मारुतीराव परमेकर, डी. एम. गुरव, बाळाराम शेलार, निरंजन सरदेसाई, विठ्ठल गुरव, जयराम देसाई, मुरलीधर पाटील, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, शामराव पाटील, राजाराम देसाई, अर्जुन देसाई, महादेव घाडी, नारायण लाड, दीपक देसाई, मुकुंद पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीसंदर्भात लवकरात लवकर प्रचार दौरे करण्याच्या सूचना मांडल्या. यावेळी तालुक्यातील समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.