हंचिनाळ केएस येथील घटना, एक गंभीर : निपाणी ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद
वार्ताहर / कोगनोळी
दुचाकीला अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 12.15 च्या सुमारास हंचिनाळ के. एस. (ता. निपाणी) येथे घडली. किरण दत्तात्रय म्हसवेकर (वय 36, रा. मल्लेवाडी, कोगनोळी) असे मृताचे तर श्रेयस अशोक नाईक (वय 23) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, किरण म्हसवेकर व श्रेयस नाईक हे कोगनोळी येथील नाईक मळ्यातून हंचिनाळ गावाकडे दुचाकीने जात होते. किरण म्हसवेकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी रस्त्याकडेला जाऊन जोरात आदळली. त्यात किरणचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला श्रेयस गंभीर जखमी झाला. श्रेयसला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. किरण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार 12 रोजी आहे. या अपघाताची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे.