आमदार प्रकाश आबिटकर यांची ग्वाही; सीपीआर रुग्णालयाची पाहणी; बैठकीत रुग्णांच्या तक्रारींचा वाचला पाढा; किडनी ट्रान्सप्लांटसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना
कोल्हापूर प्रतिनिधी
सीपीआर रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी आवश्यक तपासणी झाल्या पाहिजेत. त्यासाठी ‘एमआरआय’चा प्रस्ताव द्या. खासगी हॉस्पिटल्समध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत आहेत, त्या सीपीआरमध्ये होण्यासाठी निदान किडनी ट्रान्सप्लांटसाठी तरी प्रयत्न करा, आवश्यक सुविधांसाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सीपीआरला भेट दिली. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हॉलमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी रुग्णांकडून आलेल्या तक्रारींचा पाढाच त्यांनी वाचला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी निधीसह येणाऱया अडचणीही मांडल्या.
यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, येथे येणाऱया रुग्णांना माहिती मिळत नाही. एमआरआयसाठी बाहेर पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. डायलेसीस मशिन, सोनोग्राफी मशिन बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाविद्यालयीनस्तरावर रिक्त जागा, उपलब्ध साधनसामग्री यांची माहिती द्या, त्यासंदर्भातील प्रस्ताव द्या, आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
अधिष्ठाता डॉ. दीक्षित म्हणाले, सीपीआर इमारत दुरूस्तीसाठी 38 कोटींचा प्रस्ताव दिला आहे. एचएमआयएस प्रणालीसह एमआरआयसाठीचा प्रस्ताव दिला आहे. हॉस्पिटलला 10 टक्के निधीतून औषध खरेदी अडचणीची बनली आहे. उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीनंतर आमदार आबिटकर यांनी अपघात विभाग, प्रसुती विभाग, सिटीस्कॅन विभागाला भेट देऊन तेथील त्रुटींची पाहणी केली.
ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांसाठी कॅम्प घ्या
आमदार आबीटकर म्हणाले, हॉस्पिटलचा विस्तार आवश्यक आहे. त्यादृष्टीने रुग्णांना चांगल्या उपचार सुविधा मिळाल्या पाहिजेत. समाजसेवा विभागाने रुग्णांना योग्य ती माहिती दिली पाहिजे. दिव्यांगांच्या तपासणीसंदर्भात तक्रारी आहेत. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाच्या पातळीवर असे कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना केल्या.
प्रसुती विभागासाठी नव्या इमारतीचा वापर करा
सीपीआरमधील प्रसुती विभागासाठी इमारत तयार झाली आहे, तिचा तातडीने वापर करावा. कसबा बावडा येथील नर्सिंग सेंटरची इमारतही सीपीआरकडे हस्तांतरीत झाली आहे. तिची दुरूस्ती करून त्याचाही वापर सुरू करा. सीपीआरमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी स्टाफ आवश्यक असेल तर प्रस्ताव द्या. पण महिन्याभरात निदान येथे किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया तरी सुरू करण्यास प्राधान्य द्या, असे त्यांनी सुचित केले.
बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. आरती घोरपडे, डॉ. वसंत देशमुख, डॉ. राहुल बडे, डॉ. कर्णिक, डॉ. गुप्ता, डॉ. अजित लोकरे, डॉ. पवन खोत, डॉ. नामे, डॉ. अभिजित ढवळे, डॉ. भुपेश गायकवाड, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सई नाईक, समाजसेवा विभागाचे शशिकांत रावळ आदी उपस्थित होते.