ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आम आदमी पार्टीचे (AAP) माजी नेते आणि कवी कुमार विश्वास (KUMAR VISHWAS) यांच्या घरी आज सकाळी पंजाब पोलीस (PANJAB POLICE) दाखल झाले. स्वतः कुमार विश्वास यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
कुमार विश्वास यांनी ट्विटमध्ये त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांची छायाचित्रे शेअर करत म्हटले आहे की, “आज सकाळी-सकाळीच पंजाब पोलीस दारात हजर झाले. एकेकाळी माझ्या हस्ते पक्षात सामील झालेल्या भगवंत मान यांना इशारा देतो की, दिल्लीत बसलेल्या अरविंद केजरीवाल यांना तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात. तो एक दिवस तुमचा आणि पंजाबचा विश्वासघात करेल, देशाने माझा इशारा लक्षात ठेवावा.”
कुमार विश्वास यांच्या घरी पोलीस का दाखल झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान, पंजाबमधील निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अरविंद केजरीवाल यांनी फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता. मात्र केजरीवाल यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. केजरीवाल यांनी या आरोपांवर पलटवार करताना म्हटले होते की, कदाचित कुमार विश्वास जगातील सर्वात गोड दहशतवादी असेल, जो शाळा आणि रुग्णालये बांधतो. पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय पाहून भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष त्यांच्याविरोधात एकवटले आहेत, असं ते म्हणाले होते.