वृत्तसंस्था/ कुवैत सिटी
नुपूर शर्मा यांच्याप्रकरणी आखाती देशांमध्ये मोठय़ा विरोधानंतर भारताची निंदा करणाऱया कुवैतने आता स्वतःच्या देशात निदर्शने करणाऱया स्थलांतरित कर्मचाऱयांना अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. नुपूर शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करणाऱया सर्व निदर्शकांना देशाबाहेर काढले जाणार आहे. निदर्शकांनी देशाचे कायदे आणि नियमांचे उल्लंघन केले आहे. एकीकडे कुवैतमध्ये निदर्शकांवर कठोर कारवाई केली जात असताना भारतातील काही राज्यांमध्sय हिंसक निदर्शने होत आहेत.
कुवैतमध्ये मोठय़ा संख्येत भारतीय आणि पाकिस्तानी कामगार आहेत. परंतु कुवैतमध्ये या विदेशी कामगारांना निदर्शने करण्याचा अधिकार नाही. कुवैतचे अधिकारी निदर्शने करणाऱया विदेशी कामगारांना अटक करण्याची प्रक्रिया राबविणार आहेत. या विदेशी कामगारांना त्यानंतर डिपोर्टेशन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार असून तेथून त्यांची रवानगी मायदेशी करण्यात येणार आहे. या विदेशी कामगारांना भविष्यात कधीच कुवैतमध्ये पाऊल ठेवता येणार नाही.
कामगारांवर कारवाईस प्रारंभ
सर्व विदेशी कामगारांना कुवैतच्या कायद्यांचे पालन करावेच लागेल. विदेशी कामगारांना कुठल्याही प्रकारच्या निदर्शनांपासून दूर रहावे लागणार असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. विदेशी कामगारांना फहहील भागात निदर्शने करत नुपूर शर्मा विरोधात घोषणाबाजी केली होती. 40 हून अधिक लोक या निदर्शनांमध्ये सामील होते असे व्हिडिओत दिसून येते. या निदर्शकांमध्ये भारतीयांसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी देखील सामील होते.
कुवैत भारताचा जुना भागीदार
या कारवाईद्वारे भविष्यात कुठलाही स्थलांतरित कामगार अशाप्रकारच्या कारवायांमध्ये सामील होऊ नये अशाप्रकारचे उदाहरण मांडले जाणार असल्याचे कुवैतच्या प्रशासनाने म्हटले आहे. आखाती देशांमध्ये कुवैत हा भारताच्या सर्वात जुन्या भागीदारांपैकी एक आहे. कुवैतच्या राजघराण्याचे भारतासोबत ऐतिहासिक संबंध राहिले आहेत.
कुवैतने दर्शविला होता विरोध
यापूर्वी नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीवर आखाती देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर कुवैतने भारतीय राजदूताला पाचारण करत टिप्पणीला विरोध दर्शविला होता. भारत सरकारने नुपूर यांच्या टिप्पणीला फेटाळून लावत संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई होणार असल्याची भूमिका मांडली होती.