स्वच्छतागृह, पाण्यासह इतर सुविधा नसल्याने नाराजी : कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष
बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या रेल्वेस्थानक येथील बसस्थानकात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. स्मार्ट सिटीने सुसज्ज बसस्थानक उभारून कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतरित केले आहे. मात्र, देखभालीअभावी प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. बसस्थानकाचे सौंदर्यीकरण झाले आहे. मात्र, बसस्थानकात सुविधा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित होऊ लागला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेल्या कारवार बसस्थानकात मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शौचालय, पाणी आणि इतर सुविधा मिळत नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या बसस्थानकात कारवार, खानापूर, गोवा, रत्नागिरी, राजापूर आदी बसेस सेवा देतात. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, बसस्थानकात जागोजागी कचरा साचला आहे. इतर समस्याही उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुविधांपेक्षा अधिकतर असुविधांचाच सामना करावा लागत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. बसस्थानकात व्यावसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. मात्र, हे गाळे तसेच पडून आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचे उत्पन्न थांबले आहे. दरम्यान, परिवहनच्या अधिकाऱ्यांनी कारवार बसस्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवाय रेल्वेस्थानकाच्या व्यवस्थापकांशीही चर्चा केली. कारवार बसस्थानकात प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे परिवहनच्या एकूण उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे कारवार बसस्थानकात प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिवहनने केली आहे.