4 ते 8 महिन्यांच्या वासरांना लस, रोगाला आळा घालण्यासाठी घरोघरी मोहीम
बेळगाव : ब्रुसेलोसिस या संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. खबरदारी म्हणून 4 ते 8 महिन्यांच्या मादी जातीच्या वासरू आणि रेडकांना लस टोचली जाणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या वासरू आणि रेडकांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. राष्ट्रीय रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत 13 ते 28 फेब्रुवारी दरम्यान ही मोहीम घरोघरी राबविली जाणार आहे. पशुवैद्य शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन वासरांना लस टोचणार आहेत. ब्रुसेलोसिस हा महाभयानक रोग असून जनावरांना याची लागण झाल्यास गर्भपाताचा धोका संभवतो. शिवाय संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यास माणसालादेखील याचा धोका आहे. शिवाय अशा जनावरांचे दूधदेखील शरीरास अपायकारक आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्याने ब्रुसेलोसिसची प्रतिबंधक मोहीम सुरू केली आहे.
जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, घोडा, गाढव, कुत्रा, शेळ्या-मेंढ्या, डुक्कर, ससे आदींचा समावेश आहे. यापैकी 34 हजार 150 वासरू आणि रेडकू आहेत. या सर्व वासरू आणि रेडकांना लसीकरण केले जाणार आहे. ब्रुसेलोसिसचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. मात्र, खबरदारी म्हणून खात्याने मोहीम हाती घेतली आहे. या रोगाची लागण झाल्यास गर्भपात होऊन जनावर दगावते. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी लहान मादी जातीच्या जनावरांना ही लस दिली जात आहे. जनावरांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. या रोगावर वेळेत नियंत्रण आणण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. लम्पी, लाळ्या-खुरकत, ब्रुसेलोसिस, जंत आणि इतर आजारांची लागण होते. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्यामार्फत लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे.
शासनाकडून लसीचा पुरवठा…
जिल्ह्यातील 34 हजार 150 वासरू आणि रेडकांना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. शासनाकडून लसीकरणाचा योग्य पुरवठा झाला आहे. घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जाणार आहे. एकही वासरू किंवा रेडकू लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक, पशुसंगोपन खाते)