कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येमुळे अर्जदारांची गैरसोय : कागदपत्रांच्या पडताळणीसाठी करावी लागतेय 20 ते 25 दिवसांची प्रतीक्षा
बेळगाव : कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात सुरू असलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात केवळ दोनच कर्मचारी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पासपोर्टसाठी केल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 20 ते 25 दिवसांचा प्रतीक्षा काळ लागत आहे. यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पूर्वी बेळगावमध्ये पासपोर्ट केंद्र नसल्याने हुबळी येथे जाऊन पासपोर्टसाठी कागदपत्रांची पडताळणी करावी लागत होती. भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे तत्कालिन अधिकारी ज्ञानेश्वर मुळे व दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नाने फेब्रुवारी 2018 मध्ये बेळगावमध्ये मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी टपाल विभागाने प्रशिक्षण दिलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली.
पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढच
पूर्वी 40 व्यक्तींना दररोज पासपोर्टसाठी बोलाविले जात होते. या ठिकाणी संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती तपासली जात असून, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. सध्या ही संख्या 90 ते 100 पर्यंत पोहोचली आहे. परदेशात शिक्षण, व्यवसाय, पर्यटन, नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तसेच पासपोर्ट हा एक वैधानिक दाखला असल्यामुळे अनेक जण पासपोर्ट काढून घेतात.
टपाल खात्याच्या पुढाकाराची गरज
जानेवारी ते जुलै या कालावधीत तब्बल 10,800 नागरिकांची पासपोर्टसाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने त्यामानाने कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. यासाठी टपाल खात्यानेही पुढाकार घेऊन अर्जदारांची होणारी गैरसोय टाळण्याची गरज आहे.
केवळ दोनच कर्मचाऱ्यांमुळे गैरसोय
सध्या या सेवा केंद्रामध्ये केवळ दोनच कर्मचारी आहेत. दिवसभरात वेळ ठरवून दिलेल्या अर्जदारांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. यामुळे बऱ्याच वेळा सायंकाळनंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी वेळ अपुरा पडतो. पासपोर्ट विभागाने कर्मचारी कमी असल्याचे पत्र टपाल खात्याला दिले तर कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. परंतु, आहेत त्याच कर्मचाऱ्यांवर पासपोर्ट सेवा केंद्राचा गाडा रेटला जात आहे.