लंकेचा पहिला डाव 355 धावात समाप्त, न्यूझीलंड प. डाव 5 बाद 162
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
येथे सुरू असलेल्या यजमान न्यूझीलंड आणि लंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर लंकेने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. लंकेने पहिल्या डावात 355 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर न्यूझीलंडने दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 162 धावा जमविल्या. लंकेचे गोलंदाज प्रभावी ठरले.
लंकेने 6 बाद 305 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे उर्वरित 4 गडी 50 धावांची भर घालत तंबूत परतले. खेळाच्या पहिल्या दिवशी 39 धावांवर नाबाद राहिलेला धनंजय डिसिल्वा सातव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. त्याने 59 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या. रजिताने 39 चेंडूत 4 चौकारांसह 22, पी. जयसूर्याने 13 तर कुमाराने 2 चौकारांसह नाबाद 13 आणि असिता फर्नांडोने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. कर्णधार दिमुत करुणारत्ने, कुशल मेंडीस यांच्या समयोचित अर्धशतकांमुळे लंकेला पहिल्या डावात 350 धावांचा टप्पा ओलांडता आला. अँजेलो मॅथ्यूजने 47, धनंजय डिसिल्वाने 46 तर चंडीमलने 39 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि टिम साउदी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. साउदीने 64 धावात 5 तर हेन्रीने 80 धावात 4 आणि ब्रेस्वेलने 1 गडी बाद केला. साउदीने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची ही पंधरावी खेप आहे.
लंकेचा पहिला डाव 355 धावांवर आटोपल्यानंतर उपाहाराला सुमारे 30 मिनिटे बाकी असताना न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावाला प्रारंभ केला. लॅथम आणि कॉन्वे या सलामीच्या जोडीने सावध फलंदाजी करत 28.4 षटकात 67 धावांची भागीदारी केली. असिता फर्नांडोने न्यूझीलंडची ही सलामीची जोडी फोडताना कॉन्वेला पायचीत केले. त्याने 88 चेंडूत 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून झगडत असलेला माजी कर्णधार विलियमसन कुमाराच्या गोलंदाजीवर करुणारत्नेकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने 1 धाव जमविली. कुमाराने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना निकोल्सला झेलबाद केले. त्याने 2 धावा जमविल्या. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 3 बाद 76 अशी होती. लॅथम आणि मिचेल या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 58 धावांची भागीदारी केली. असिता फर्नांडोच्या स्वींग झालेल्या चेंडूवर लॅथमचा त्रिफळा उडाला. त्याने 144 चेंडूत 7 चौकारांसह 67 धावा जमविल्या. रजिताने टॉम ब्लंडेलला डिक्वेलाकरवी झेलबाद केले. त्याने 7 धावा जमविल्या. न्यूझीलंडचा निम्मा संघ 151 धावात बाद झाला. मात्र, आता मिचेल एका बाजूने सावध फलंदाजी करत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 40 धावांवर तर अष्टपैलू ब्रेस्वेल 1 चौकारासह 9 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडच्या या दोन अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवर संघाचे भवितव्य अवलंबून राहील. न्यूझीलंडचा संघ खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर 193 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत. लंकेतर्फे असिता फर्नांडो आणि कुमारा यांनी प्रत्येकी 2 तर रजिताने 1 गडी बाद केला. लॅथमचे कसोटीतील हे 27 वे अर्धशतक आहे.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 92.4 षटकात सर्वबाद 355 (कुशल मेंडीस 87, करुणारत्ने 50, मॅथ्यूज 47, धनंजय डिसिल्वा 46, चंडीमल 39, रजिता 22, ओशादा फर्नांडो 13, जयसूर्या 13, असिता फर्नांडो 10, कुमारा नाबाद 13, टिम साउदी 5-64, मॅट हेन्री 4-80, ब्रेस्वेल 1-17), न्यूझीलंड प. डाव 63 षटकात 5 बाद 162 (लॅथम 67, कॉन्वे 30, विलियमसन 1, निकोल्स 2, मिचेल खेळत आहे 40, ब्लंडेल 7, ब्रेस्वेल खेळत आहे 9, असिता फर्नांडो 2-42, कुमारा 2-34, रजिता 1-38).