पिंपरी / प्रतिनिधी :
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेवरील पोटनिवडणुकीच्या चर्चांना सुरूवात झाली असली तरीही ही जागा लढविण्याबाबत अद्याप महाविकास आघाडीची भूमिका ठरली नाही. पण परिस्थिती पाहून पोटनिवडुकीसंदर्भात निर्णय घेऊ, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात विचारले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभा आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमधील विधानसभेची जागा रिक्त आहे. निवडणूक आयोग ही निवडणूक लावेल. पण याबाबतची महाविकास आघाडीची भूमिका अद्याप ठरलेली नाही. 2019 च्या निवडणुकीत चिंचवडची जागा आम्ही पुरस्कृत केली होती. कसब्याची जागा काँग्रेसने लढविली होती.
निवडणूक लागली नसताना आत्ताच त्यासंदर्भात चर्चा करण्यात अर्थ नाही. मुंबईतील पोटनिवडणुकीत वेगळे आणि पंढरपूर, नांदेडच्या पोटनिवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळाले होते. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत त्या-त्या वेळची परिस्थिती बघून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले.