32 वर्षे जुन्या प्रकरणी झाली शिक्षा : अवधेश राय हत्येचे गुन्हेगार
वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तरप्रदेशातील माफिया मुख्तार अंसारीला वाराणसी येथील एमपी/एमएलए न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 32 वर्षे जुन्या अवधेश राय हत्याप्रकरणी अन्सारीला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवधेश राय हे काँग्रेसचे माजी आमदार अजय राय यांचे बंधू होते. माफिया मुख्तार सध्या बांदा तुरुंगात कैद आहे. मुख्तारला सोमवारी व्हर्च्युअली सुनावणीसाठी हजर करण्यात आले. तर अन्य आरोपी प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
वाराणसीमध्ये 3 ऑगस्ट 1991 रोजी अवधेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अजय राय अन् अवधेश राय हे घराबाहेर उभे असताना हा हल्ला झाला होता. पळून जाण्याच्या नादात हल्लेखोरांनी कार तेथेच सोडून दिली होती. याप्रकरणी अजय राय यांनी पोलीस स्थानकात मुख्तार अंसारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्यासोबत माजी आमदार अब्दुल कलाम यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता.
दोन आरोपींचा मृत्यू
मुख्तार सध्या तुरुंगात कैद आहे, तर भीम सिंहला गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत अन्य एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली असून तो गाझीपूर तुरुंगात आहे. कमलेश सिंह अन् अब्दुल कलामचा मृत्यू झाला आहे. मागील 9 महिन्यांमध्ये मुख्तारला 5 प्रकरणांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अवधेश राय हत्याप्रकरणी शिक्षा सुनावली जाण्यापूवीं तुरुंगात हल्ला होऊ शकतो अशी भीती मुख्तारने वकिलामार्फत न्यायालयासमोर व्यक्त केली होती.
अवधेश राय हत्याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मूळ केस डायरी गायब झाली होती. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी एमपी/एमएलए न्यायालयात त्याची झेरॉक्स प्रत सादर केल्यावर याचा खुलासा झाला होता. यावर मुख्तारच्या वकिलाने आक्षेप नोंदविला होता. तर सरकारी पक्षाने झेरॉक्स प्रतीच्या आधारावरच सुनावणीची मागणी केली होती. मूळ केस डायरी गायब करविण्यात मुख्तारचाच हात होता असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. 2007 मध्ये सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता.