अबकारी पोलिसांची कारवाई, एकाला अटक
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर तालुक्मयातील कणकुंबीजवळ गोवा बनावटीची तब्बल 9 लाख 33 हजार 320 रुपयांची दारू अबकारी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी वाहतूक करणारे वाहन आणि एका आरोपीला अटक केली आहे. शनिवारी रात्री 3 च्या सुमारास ही कारवाई कशली आहे.
गोव्याहून बेळगावकडे वाहनातून मोठय़ा प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली. अबकारी खात्याचे आयुक्त मंजुनाथ, साहाय्यक आयुक्त फिरोजखान किल्लेदार आणि अबकारी उपायुक्त जयरामेगौडा, एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक दावलसाब शिंदोगी, सदाशिव कोरती, अबकारी उपनिरीक्षक जयराम हेगडे, पुष्पा गदाडे यांनी ही कारवाई केली आहे.
आरोपी टाटा टर्बो क्रमांक एमएच 07 सी 6712 मधून 909 लिटर गोवा बनावटीची दारू नेत होता. त्यानंतर हे वाहन कणकुंबीजवळ अडवून झडती घेतली. त्यामध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. या कारवाईमध्ये अबकारी खात्याचे मंजुनाथ बळगप्पण्णावर, इरण्णा घाळी, प्रकाश डोणी, अरुणकुमार बडगी, रायाप्पा मण्णिकेरी यांनीही सहभाग घेतला होता.