ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सकाळी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. अंधेरी येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गुफी पेंटल बऱ्याच काळापासून वयोमानाशी संबंधित अनेक आजारांशी लढत होते. पेंटल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावत असल्याने त्यांना 31 मे रोजी अंधेरी येथे उपचारासाठी आणले गेले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याची बातमी आली होती. मात्र, आज सकाळी उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गुफी यांनी ‘रफू चक्कर’ या चित्रपटातून 1975 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 80 च्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, गुफी पेंटल यांना खरी ओळख ही 1988 साली प्रदर्शित झालेल्या बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतून मिळाली होती. या मालिकेत त्यांनी शकुनी मामा ही भूमिका साकारली होती. ही भूमिका लोकप्रिय झाली होती. पेंटल यांनी अभिनयाव्यतिरिक्त काही टीव्ही शो आणि श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. त्यांनी बीआर फिल्म्ससोबत असोसिएट डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे.