सातारा उपनगर व सर्वात मोठय़ा ग्रामपंचायतीत 20 वर्षानंतर सत्तांतर
प्रतिनिधी/ सातारा
शहराचे सर्वात मोठं उपनगर असलेल्या आणि गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या सत्तेला आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलने सुरुंग लावला. आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे असे बलाढय़ पॅनेल एका बाजूला असताना एकटय़ा महेश शिंदेंनी तिन्ही आमदारांना खेडमध्ये सळो की पळो करुन सोडले. महेश शिंदे यांच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 12 जागा तर शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे या आमदार त्रयींच्या खेड ग्रामविकास पॅनेलला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर महेश शिंदेंच्या पॅनेलने जल्लोष केला. यावेळी स्वतः आ. महेश शिंदे यांनीही डान्स केला.
सध्या राजकीय घडामोडी मोठय़ा घडू लागलेल्या आहेत. राज्यात जसे शिंदेशाहीच्या बाजूने कौल लागत आहे. तसाच गाव पातळीवर शिंदेशाहीलाच कौल लोक देताना दिसत आहेत. सातारा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींचे निकाल दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट झाले. सर्वात मोठी खेड या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता तब्बल 20 वर्ष होती. याही निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील आणि त्यांचेच मित्र भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मानणारे एक पॅनेल होते. त्या पॅनेलच्या विजयासाठी दस्तुरखुद्द आमदार शशिकांत शिंदे यांनी तर खेडमध्ये तीन ते चार वेळा गावात प्रचारानिमित्ताने थांबले होते. कार्यकर्त्यांवर त्यांचा मोठा जीव आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे बळ दिल्याने कार्यकर्त्यानी कसल्याही परिस्थितीत खेड ग्रामपंचायत निवडून आणायचीच यासाठी जीवाचे रान केले होते. परंतु उलट बाजूला एकटे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या विचाराचे पॅनेल होते. त्या पॅनेलच्या विजयासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मधूताई कांबळे, माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, अप्पा माने, भाजपाचे गणेश पालखे आणि भिमराव लोखंडे यांनी प्रयत्न केला. या सर्व प्रक्रियेकडे दस्तुरखुद्द आमदार महेश शिंदे यांचे लक्ष होते. जेव्हा आमदार महेश शिंदे हे प्रचारानिमित्ताने गावात गेले होते. तेव्हाच त्यांनी सर्वसामान्य मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधला आणि तेथेच पारडे फिरले.
खेडमध्ये विजयासाठी आमदारांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे, त्यांच्या सौभाग्यवती डॉ. प्रिया शिंदे यांनीही खेडमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रचार केला. अगदी सोशल मीडियावरही प्रचारामध्ये अग्रभागी राहिल्या होत्या. त्यामुळे सरपंचपदाच्या उमेदवार असलेल्या लता फरांदे यांनी आमदार शशिकांत शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार अनिता बोराटे यांचा सुमारे 1200 मतांनी पराभव केला.
गुलालामध्ये नाचले आमदार महेश शिंदे
शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलचा विजय खेडमध्ये झाल्याचे समजताच आमदार महेश शिंदे हे स्वतः साताऱयात दाखल झाले. त्यांनी विजयी उमेदवारांच्यासोबत मिरवणुकीत सहभागी होऊन देहभान होऊन नाचले. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत नाच केला.
दरम्यान, मीडियाशी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. आपण पहाता सगळयात मोठी ग्रामपंचायत खेड ही असून तिचा निकाल पाहता जनतेने आम्हाला मोठय़ा मताधिक्यांनी निवडून दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. म्हणून जनतेने निवडून दिले आहे. या सातारा जिह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळते आहे. तीन आमदार आणि एका खासदारांची ताकद होती. परंतु माझ्या मागे एकनाथ आणि देवेंद्र आहेत त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. महाराष्ट्रातील सामान्य व्यक्तीच्या मागे ते उभे आहेत. येथून पुढे चुकीच्या शक्तीचा पराभव होणार आहे. गोजेगाव, चिंचणेर निंब आणि खिंडवाडी येथे अपेक्षित यश मिळाले आहे, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.