नवी दिल्ली : ऑनलाईन टीम
आज ट्वीटर विविध हॅशटॅगचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यात #PrashantKishor यांच्या नावाचा हॅशटॅग ट्वीटर चांगलाच चर्चेत आला आहे. याला कारण ही तसेच आहे. ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांनी बंगालमधील निकालाबाबत काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली होती. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही, अशी भविष्यवाणी वर्तवली होती. त्यामुळेच त्यांचे नाव आज ट्वीटरवर चर्चेत आले आहे.
प्रशांत किशोर यांनी 21 डिसेंबर रोजी ट्वीट करत म्हटले होते की, “माध्यमातील एक वर्ग भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण तयार करत आहे. यातून हे स्पष्ट होतंय की भाजप दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडत आहे. माझं आवाहन आहे की, हे ट्विट जपून करून ठेवा आणि जर भाजपानं चांगलं प्रदर्शन केलं तर मी ट्विटर सोडून देईन, अशी घोषणा किशोर यांनी केली होती.
आज सकाळपासून ट्वीटरवर #ExitModi, #BJPKorbe200Paar, #SuvenduAdhikari, #PrashantKishor, #MamataBanerjee हे हॅशटॅग चांगलेच चर्चेत आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपची पहिल्या फेरीपासून सुरू असलेली घोडदौड मंदावली असून, तृणमूलला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सर्व जागांच्या आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 192 जागांवर मुसंडी मारली आहे. तर भाजप 95 आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे. ही आकडेवारी पाहता सोशल मीडियावर प्रशांत किशोर यांच्या नावाचा ट्रेंड चांगलाच चर्चेत आला आहे.