शाहूवाडी, प्रतिनिधी
Maratha reservation Jalna Lathi Charge : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ,शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शाहुवाडी मलकापूर पंचक्रोशीत कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवतीर्थ सुभाष चौक येथे झालेल्या निषेध सभेत सर्वच प्रमुखांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.
जालना येथील झालेल्या घटने संदर्भात शाहूवाडी तालुक्यात चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत.सकल मराठा समाज मलकापूर पंचक्रोशीच्या वतीने बुधवार सहा सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये मलकापूर शहरातील सर्व व्यापारी तसेच शाहुवाडी येथील व्यापारी वर्गाने सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून निषेध सभेला सुरुवात करण्यात आली.
या निषेधाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ सुभाष चौक मलकापूर येथे निषेध सभा घेण्यात आली .यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील,माजी नगरसेवक सुधाकर पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार ,प्रकाश पाटील,प्रकाश कांबळे,सुहास पाटील,दस्तगीर अत्तार ,दत्ता वारकरी ,अभिषेक पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .सर्वांनीच मनोगतामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे,मराठा समाजावर अन्याय होत राहिल्यास या पेक्षाही अधिक तीव्र लढा केला जाईल. जालन्यातील घटनेला राज्य सरकारच जबाबदार आहे. सरकारने तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा,लाठी हल्ल्याचा आदेश कोणी दिला याचाही शोध घ्यावा यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही निशाणा साधला.
या निषेध सभेप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमाने ,माया पाटील ,रमेश चांदणे,संजय पाटील ,गुलाब भटारी ,शौकत कळेकर ,नौशाद मणेर,राजाराम मगदूम,अमित पाटील,प्रदीप पवार ,किसन चांदणे,बाबू सोनावळे ,किशोर सनगर ,बी एस पाटील ,हनुमंत कवळे ,गोपाळ पाटील आदींच्या सह सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे यांच्यासह शाहूवाडी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.