बेळगाव : शनिवारी वटपौर्णिमा असून, यानिमित्त बाजारपेठेत वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य दाखल झाले आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करुन महिला त्या भोवती धागे गुंडाळतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा या श्रद्धेपोटी महिला हे व्रत करतात. या व्रताच्या निमित्ताने वटसावित्रीच्या कथेचा पट पूजला जातो. त्यामुळे हा कथापट बाजारात विक्रीस आला आहे. तसेच या पूजेसाठी केळी, जांभूळ, फणसाचे गरे, धामणं, असा प्रामुख्याने रानमेवा आवश्यक असतो. बाजारात जांभूळ आणि फणसाचे गरे यांची आवक वाढली असून जांभाळाचे दर मात्र चढे आहेत. पुजेसाठी हळदी-कुंकूचे करंडे, मणीमंगळसूत्र, आरसा-फणी, जोडवी या साहित्यासह द्रोणही उपलब्ध आहेत. 15 ते 25 रुपये अशी या द्रोणची किंमत आहे.
खानापुरातही गर्दी
नंदगड : वटसावित्री पौर्णिमा आज असल्याने शुक्रवारी खानापूर बाजारात पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. अलीकडे सर्वच महिला वटसावित्री पौर्णिमेनिमित्त उपवास करतात व वडाच्या झाडाची पूजा करतात. पूजेसाठी द्रोण, दोरा, मनी व अन्य साहित्य तसेच जांभळे, आंबा, फणस यांची खरेदी करण्यात आली. वटपौर्णिमेनिमित्त खानापूर स्टेशन रोडजवळ असलेल्या सती मंदिरात पूजा करण्यात येते. त्याठिकाणी मंडपही घालण्यात आला आहे. ग्रामीण भागात असलेल्या वडाच्या झाडांच्या आजूबाजूची स्वच्छताही करण्यात आली आहे.