आगामी दोन वर्षे आव्हानात्मक असल्याचे नडेलांचे वक्तव्य
वॉशिंग्टन
ट्विटर, मेटा आणि इतर अनेक टेक कंपन्यांनंतर, आता मायक्रोसॉफ्ट अनिश्चित मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणावर टाळेबंदीची तयारी करत आहे. द व्हर्जच्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट या आठवडय़ात 5 टक्के कर्मचाऱयांना (सुमारे 11,000) कमी करू शकते. या छाटणीचा प्रामुख्याने अभियांत्रिकी विभागातील लोकांना फटका बसणार असल्याची माहिती आहे.
30 जूनपर्यंत, कंपनीकडे 221,000 पूर्णवेळ कर्मचारी होते, ज्यात यूएसमधील 122,000 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 99,000 कर्मचारी होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मायक्रोसॉफ्टने सर्व विभागांमधील सुमारे 1,000 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे.
छाटणीचे संकेत बऱयाच दिवसांपासून
टाळेबंदीची बातमी पूर्णपणे आश्चर्यकारक नाही कारण मायक्रोसॉफ्ट काही काळापासून याबद्दल इशारा देत आली आहे. कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, मायक्रोसॉफ्ट जागतिक अनिश्तितेला तोंड देत आहे. पुढची 2 वर्षे टेक कंपन्यांसाठी आव्हानात्मक राहणार असल्याचेही म्हटले आहे.
खर्च वाचवण्यासाठी हा निर्णय
गेल्या 5 महिन्यात, अनेक यूएस टेक दिग्गजांनी ऑपरेशनल खर्चात बचत करण्यासाठी हजारो कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. अलीकडेच, ऍमेझॉननेदेखील 18,000 कर्मचाऱयांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.