उच्च न्यायालयाचा आदेश : आमदाराला मोठा दिलासा
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपचे आमदार माडाळ विरुपक्षप्पा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकायुक्त पोलिसांनी त्यांचा मुलगा माडाळ प्रशांत यांच्यावर छापा टाकल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात 8 कोटींहून अधिक बेहिशेबी रोकड सापडल्याप्रकरणी माडाळ विरुपक्षप्पा आणि इतर सहा जणांविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलाच्या लाचखोरी प्रकरणातील आरोपी, केएसडीएलचे माजी अध्यक्ष भाजप आमदार माडाळ विरुपक्षप्पा यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती नटराजन यांनी विरुपक्षप्पा यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याचा आदेश जारी केला आहे.
उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी निकाल दिला आहे. आमदारांना अंतरिम जामीन मंजूर केला असून आदेश मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले. लोकायुक्त पोलिसांनी योग्य ती कागदपत्रे सादर करेपर्यंत आमदारांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 17 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. अंतरिम जामीन देताना आमदाराला 5 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक आणि दोन जामीन भरण्याची अट घालण्यात आली आहे. अटकेची भीती असलेले आमदार माडाळ विरुपक्षप्पा हे गेल्या 6 दिवसांपासून फरार होते.
आमच्याकडे कागदपत्रे असून पैसे परत मिळविणार : विरुपक्षप्पा
लोकायुक्त छाप्यानंतर बेपत्ता झालेले भाजपचे आमदार आणि केएसडीएलचे माजी अध्यक्ष माडाळ विरुपक्षप्पा यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर ते चेन्नगिरीतील आपल्या निवासस्थानी हजर झाले आहेत. कार्यकर्त्यांचे त्यांचे जल्लोषी स्वागत केले आहेत. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी कोणतीही चूक केलेली नाही. लोकायुक्तांच्या छाप्यात सापडलेल्या सर्व पैशांची योग्य नोंद आमच्याकडे आहे. ते पैसे परत मिळतील, असे सांगितले. माझ्या विरोधात कोणीतरी कट रचला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर छापा टाकण्याची इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.