पुणे / वार्ताहर :
वारजे माळवाडी परिसरात साथीदारांच्या मदतीने वेगवेगळे गंभीर गुन्हे करणाऱ्या ओंकार ऊर्फ टेडय़ा उमेश सातपुते टोळीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही 42 वी कारवाई आहे.
ओंकार सातपुते (वय 23, रा. वारजे माळवाडी, पुणे), वीर फकीरा युवराज कांबळे (22, रा. शिवणे, पुणे) यांच्यासह अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. ओंकार सातपुते हा प्रत्येक गुन्हय़ात काही सामाईक व काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या टोळीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, गुन्हा करण्यासाठी कट रचणे, सर्वसामान्य नागरिकांचे मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, पोलीस आदेशाचा भंग करणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1) , 3 (2) नुसार कारवाई करण्यात आली आहे.