विदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना अटक : एटीएसची कारवाई
► वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरात पोलीस आणि एटीएसने पोरबंदरमध्ये संयुक्त कारवाई मोहीम राबवून दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’च्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एटीएसच्या पथकाने एका महिलेसह 4 संशयितांना अटक केली आहे. एसटीएसने या संशयितांच्या हालचालींवर बराच काळ नजर ठेवली होती. ‘आयएसआयएस’शी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या मुख्य कारवाईनंतर अन्य एका साथीदाराला अटक करण्यासाठी पथके सातत्याने छापे टाकत आहेत. छाप्यादरम्यान तपास पथकाला अनेक प्रतिबंधित वस्तूही सापडल्या आहेत.
तपास यंत्रणेने छापा टाकून चार संशयितांना अटक केली. या चौघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. चौघेही इसिसच्या सक्रिय गटाचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील होण्यासाठी काही लोक परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. यावर गुप्तचर विभागाच्या नेतृत्वाखाली एनआयए पथकाने मध्यप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) 13 ठिकाणी छापे टाकून चार संशयितांना अटक केली.
‘युएपीए’ अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा
दहशतवाद विरोधी पथकाने पोरबंदर येथून तीन जणांना आणि सुरत शहरातील एका महिलेला अटक केल्याची माहिती पोलीस महासंचालक (डीजीपी) विकास सहाय यांनी दिली. या चौघांविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अन्य आरोपी जुबेर अहमद मुन्शी याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इराणमार्गे अफगाणिस्तानात जाण्याचा कट
अटक करण्यात आलेले तिघे जण पोरबंदरहून मासेमारी बोटीचा वापर करून आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडून इराणमार्गे अफगाणिस्तानात जाण्याचा आणि ‘आयएस’मध्ये सामील होण्याचा विचार करत होते. त्यांना शुक्रवारी सकाळी पोरबंदर येथून ताब्यात घेण्यात आले असून उबेद नासिर मीर, हनान हयात शोल आणि मोहम्मद हाजीम शाह अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अबू हमजा नामक हँडलरने प्रशिक्षित करून कट्टरपंथी बनवल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
मोबाईल, टॅब्लेट, शस्त्रे जप्त
गुजरात एटीएस आणि सुरत गुन्हे शाखेने एका गुप्त माहितीच्या आधारे सुमेरा मालेकच्या घरावर छापा टाकून तेथून ‘व्हॉईस ऑफ खोरासान’ सारखी अनेक मूलगामी प्रकाशने जप्त केली. तसेच पोरबंदरमधून ताब्यात घेतलेल्या तिघांकडून त्यांच्या वैयक्तिक ओळखीशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि डिजिटल संप्रेषणासाठी वापरले जाणारे मोबाईल फोन, टॅब्लेट आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.