सित्सिपस, शॅपोव्हॅलोव्ह, सिनर यांचेही विजय, वावरिंका, केनिन पराभूत, किर्गीओसची माघार
वृत्तसंस्था/ मेलबर्न
या वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली असून सातवी मानांकित कोको गॉफ, अग्रमानांकित इगा स्वायटेक, स्पेनचा राफेल नदाल, ब्रिटनची एम्मा रॅडुकानू, सित्सिपस, यानिक सिनर, शॅपोव्हॅलोव्ह, कॅमेरॉन नोरी, मेदवेदेव्ह, मॅडिसन कीज, व्हिक्टोरिया अझारेन्का, ओस्टापेन्को, सॅकेरी, क्विटोव्हा यांनी विजयी सलामी देत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसने मात्र अनपेक्षितपणे माघार घेतली तर स्टॅनिसलास वावरिंका व सोफिया केनिन यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
अमेरिकेच्या 18 वर्षीय कोको गॉफने झेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोव्हाचा 6-1, 6-4 असा सहज पराभव केला. तिची पुढील लढत 2021 ची चॅम्पियन एम्मा रॅडुकानूशी होईल. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची गॉफची ही चौथी वेळ आहे. 20 वर्षीय रॅडुकानूने तमारा कोरपाश्चचा 6-3, 6-2 असा सुमारे दीड तासाच्या खेळात पराभव केला. युक्रेनच्या मार्टा कोस्टयुकने दुसरी फेरी गाठताना 28 व्या मानांकित अमांदा ऍनिसिमोव्हावर 6-3, 6-4 अशी मात केली. कोस्टयुकची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या वाईल्डकार्ड प्रवेशधारक ऑलिव्हिया गॅडेकीशी होईल. 20 वर्षीय गॅडेकीने ग्रँडस्लॅम पदार्पणात पोलिना कुडरमेटोव्हाचा 7-5, 6-1 असा पराभव केला.
स्वायटेकचा संघर्ष
जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या स्वायटेकने दुसरी फेरी गाठताना संघर्ष करावा लागला. जर्मनीच्या ज्युल नीमियरने तिला विजयासाठी बरेच झुंजवले. दोन तासाच्या लढतीत स्वायटेकने नीमियरवर 6-4, 7-5 अशी मात केली. तीन ग्रँडस्लॅम जिंकणाऱया स्वायटेकची पुढील लढत कोलंबियाच्या कॅमिला ओसोरोशी होणार आहे. याशिवाय जेसिका पेगुला, डॅनियली कॉलिन्स यांनीही दुसरी फेरी गाठली. अन्य लढतीत 17 व्या मानांकित एलेना ओस्टापेन्कोने यास्त्रेम्स्काचा 6-4, 6-2, 24 व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने सोफिया केनिनचा 6-4, 7-6 (7-3), सहाव्या मानांकित मारिया सॅकेरीने युवानचा 6-1, 6-4, पंधराव्या मानांकित पेत्र क्विटोव्हाने व्हान उत्वांकचा 7-6 (7-3), 6-2, दहाव्या मानांकित मॅडिसन कीजने ब्लिन्कोव्हाचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
नदाल, सिनरचे विजय
पुरुष एकेरीत विद्यमान विजेत्या राफेल नदालला दुसरी फेरी गाठण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागला. त्याने जॅक ड्रेपरचा 7-5, 2-6, 6-4, 6-1 असा पराभव केला. साडेतीन तास ही लढत रंगली होती. यानिक सिनरने या स्पर्धेची जोरदार सुरुवात करताना ब्रिटनच्या काईल एडमंडचे आव्हान संपुष्टात आणले. इटलीच्या या 15 व्या मानांकित खेळाडूने एडमंडचा 6-4, 6-0, 6-2 असा फडशा पाडला. दुसऱया फेरीत त्याची लढत टॉमस मार्टिन एचेव्हेरी किंवा ग्रेगॉयर बॅरेरे यापैकी एकाशी होईल.
अन्य एका लढतीत चीनच्या 17 वर्षीय शँग जुनचेंगने ग्रँडस्लॅम पदार्पणात चीनसाठी इतिहास निर्माण करताना जर्मनीच्या ऑस्कर ओटेवर 6-2, 6-4, 6-7 (2-7), 7-5 अशी संघर्षपूर्ण मात केली. ओपन इरामध्ये ग्रँडस्लॅम पदार्पणात पहिला सामना जिंकणारा तो आशियातील पहिला टेनिसपटू बनला आहे. पात्रता फेरीतून आलेल्या जुनचेंगने आक्रमक खेळाचा उपयोग करीत सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. त्याने तिसऱया मॅचपॉईंटवर सामना संपवला. या स्पर्धेत खेळणारा यावर्षीचा तो सर्वात युवा खेळाडू आहे.
वावरिंका पराभूत
रशियाच्या सातव्या मानांकित डॅनील मेदवेदेव्हने दुसरी फेरी गाठताना गिरॉनचा 6-0, 6-1, 6-2 असा फडशा पाडला तर हॅरिसने मुसेटीवर 6-4, 6-1, 6-7 (0-7), 2-6, 7-6 (10-4) अशी संघर्षपूर्ण मात केली. तिसऱया मानांकित स्टेफानोस सित्सिपसने दुसरी फेरी गाठताना हॅलीसचा 6-3, 6-4, 7-6 (8-6) असा पराभव केला. 11 व्या मानांकित कॅमेरॉन नोरीने व्हान ऍसचेचा 7-6 (7-3), 6-0, 6-3, कॅनडाच्या 20 व्या मानांकित डेनिस शॅपोव्हॅलोव्हने लॅजोविचचा 6-4, 4-6, 6-4, 6-1, मोल्कानने स्टॅनिसलास वावरिंकाचा 7-6 (7-3), 3-6, 6-1, 6-7 (2-7), 6-4 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.