जानेवारी महिन्यात संपणार कार्यकाळ ः पुढील काळात विधानसभा-लोकसभा निवडणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगतप्रकाश नड्डा यांना भाजप अध्यक्ष म्हणून मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यांचा वाढीव कार्यकाळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राहणार असल्याचे समजते. नड्डा यांचा वर्तमान कार्यकाळ 20 जानेवारी 2023 रोजी संपुष्टात येणार आहे. नड्डा यांनी 2020 मध्ये भाजप अध्यक्षपद स्वीकारले होते. भाजपमध्ये दर तीन वर्षांनी अध्यक्षाची निवड होते.
पुढील वर्षापर्यंत 10 राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक पाहता नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नड्डा हे जुलै 2019 मध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. त्यानंतर 20 जानेवारी 2020 रोजी ते पक्षाध्यक्ष झाले. त्यांची निवड सर्वसंमतीने झाली होती. तत्पूर्वी अमित शाह यांचाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून कार्यकाळ वाढविण्यात आला होता.
भाजपच्या घटनेनुसार राज्य शाखांची 50 टक्के संघटनात्मक निवडणूक पूर्ण झाली तरच पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. अशा स्थितीत नड्डा यांना वाढीव कार्यकाळ मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
10 राज्यांमध्ये निवडणूक
भाजपचे नेते राज्यांमध्ये होणाऱया निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. चालू वर्षात गुजरात, हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. तर पुढील वर्षी 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होईल. यात कर्नाटक, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा समील आहे. याचबरोबर भाजप लोकसभा निवडणुकीला नजरेसमोर ठेवून तयारी करत आहे.
नव्या प्रदेश प्रभारींची बैठक
भाजप अध्यक्ष नड्डा हे मंगळवारी नव्या प्रदेश प्रभारींसोबत बैठक करणार आहेत. ही बैठक मंगळवारी सकाळी 10 वाजता पक्ष मुख्यालयात होणार आहे. तर नड्डा हे संध्याकाळी पक्ष महासचिवांसोबत देखील बैठक घेणार आहेत. आगामी गुजरात तसेच हिमाचल प्रदेश निवडणूक पाहता ही बैठक बोलाविण्यात आल्याचे मानले जात आहे.