ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनी लाँड्रिंग प्रकरणात कारागृहात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे डी-गँगसोबत थेट संबंध असल्याचे निरीक्षण मुंबई विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. याचे पुरावेही उपलब्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. (court says, Nawab Malik’s direct connection with D-Gang)
नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयानं दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात होते. मलिकांच्या त्यांच्यासोबत वारंवार बैठका होत असत.गोवावाला कम्पाऊंड कशी हडप करायची, याचा कट त्यांनी एकत्रित रचला होता. यासाठीची पाहणी करायला त्यांनी एक माणूसही नेमला होता. गोवावाला कम्पाऊंडमधील मालमत्ता बळकावण्यासाठी त्यांनी डी-गँगची मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे आढळले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे मलिकांविरोधात दाखल असलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात ते प्रथमदर्शनी सामील असल्याचे दिसते. आता याप्रकरणी सुरू होणाऱ्या खटल्यात आरोपनिश्चिती केली जाईल. जर नवाब मलिकांनी त्यांच्या विरोधातले आरोप फेटाळले तर मग ते कसे निर्दोष आहेत? हे त्यांच्या वकिलांना खटल्या दरम्यान न्यायालयाला आपल्या युक्तिवादातून पटवून द्यावं लागेल.