वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल भालाफेकधारक अॅथलिट तसेच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने हेंग्लो येथे होणाऱ्या एफबीके आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतून स्नायू दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
2023 च्या अॅथलेटिक्स हंगामाला नीरज चोप्राने दमदार प्रारंभ करताना डोहा डायमंड लिग अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. दरम्यान त्याला या स्पर्धेनंतर स्नायू दुखापतीची समस्या प्रखरतेने जाणवली. या दुखापतीवर तो वैद्यकीय इलाज करुन घेणार आहे. दरम्यान पुन्हा अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पुनरागमनासाठी त्याला किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. नीरज चोप्राने आपल्या ट्विटरवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता. पुढील महिन्यात झेक प्रजासत्ताक येथे होणाऱ्या गोल्डन स्पाईक ओस्ट्रेव्हा स्पर्धेत नीरज चोप्रा सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच हंगेरीत होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा निश्चित सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. जागतिक भालाफेकधारक अॅथलिट्सच्या ताज्या मानांकनात नीरज चोप्राने अलिकडेच 1455 मानांकन गुण घेत पहिले स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये झुरीच येथे झालेल्या 2022 च्या डायमंड लिग अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळविले होते.