मनपा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर पेच
बेळगाव : महापालिकेने मार्चअखेरपर्यंत 55 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. यापैकी 48 कोटी मालमत्ता कर जमा झाला असून, उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून थकबाकीदारांना नोटीस बजावण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र काही मालमत्ताधारक नोटीस स्वीकारत नाहीत तर नोटीस घेतलेले मालमत्ताधारक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. 70 हजारहून अधिक मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरली नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही मालमत्ताधारकांनी कित्येक वर्षांपासून मालमत्ता कर भरला नाही. थकबाकीदारांची यादी तयार करून घरपट्टी वसुलीची मोहीम महसूल विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांना 7 दिवसांची मुदत देऊन नोटीस बजावण्याची सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यानुसार महसूल विभागाकडून थकबाकीदारांना नोटीस बजावण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. नोटीस बजावण्यासाठी मनपाचे कर्मचारी थकबाकीदारांच्या घरी जात आहेत. मात्र मालमत्ताधारक नोटीस स्वीकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही मालमत्ताधारकांनी नोटीस घेतली. पण नोटिसीची मुदत संपल्यानंतरही घरपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महसूल वसुलीसाठी कोणती कारवाई करायची, असा पेच कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 100 टक्के घरपट्टी वसुली करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून सूचना करण्यात येत आहे. पण मालमत्ताधारक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने मनपा कर्मचारी अडचणीत आले आहेत. महापालिकेकडून दरवर्षी घरपट्टी वसुलीसाठी जागृती करण्याकरिता कचरावाहू वाहनामार्फत तसेच दोन रिक्षांद्वारे आवाहन केले जाते. मात्र यावर्षी कोणतीच जागृती मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.