स्मार्ट बसस्थानकाची दुरवस्था, प्रवाशांची गैरसोय : कॅन्टोन्मेंटच्या कारभाराबाबत संताप
प्रतिनिधी / बेळगाव
प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रेल्वेस्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास करण्यात आला. मात्र बसस्थानक कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करून सहा महिने झाले तरी हे बसस्थानक अद्यापही अंधारात आहे. तसेच परिवहन मंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोटीचा निधी खर्च करून शहरवासियांना विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून या सुविधाची देखभाल करण्यात येत नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारित येणाऱया रेल्वेस्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास करण्यात आला आहे. पण कॅन्टोन्मेंट बोर्डकडून देखभाल करण्याकडे आणि प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बसस्थानकाचा विकास करून कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करून सहा महिने झाले. पण बसस्थानकावर परिवहन मंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले नाही. मुख्यतः बसस्थानकाची विद्युतजोडणी करण्यात आली नसल्याने परिसर अद्यापही अंधारात आहे.
बसस्थानकावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी रात्रीच्यावेळी गैरप्रकार वाढले असून याठिकाणी बेघर नागरिक आसरा घेत आहेत. रात्रीच्यावेळी मद्यपान व धूम्रपान करण्यासाठी बसस्थानकाचा वापर होत आहे. तसेच परिवहन मंडळाचे कार्यालय सुरू केले नसल्याने बसस्थानकात प्रवाशांना कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. या बसस्थानकात आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.