सांबा
जम्मू-काश्मीरमधील सांबा जिह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ही संचारबंदी आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या 1 किलोमीटरच्या परिघात लागू करण्यात आली आहे. सीमेपलीकडून सातत्याने होणारी घुसखोरी आणि ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत परिसरात सर्वसामान्य नागरिकांना हालचाली करण्यास बंदी घालण्यात आली असून संशयितांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या माध्यमातून अमलीपदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करीचे प्रमाण वाढल्यामुळे या भागात सुरक्षा गस्त वाढवून बेकायदेशीर कारवायांवर नजर ठेवली जात आहे.