महे ग्रामपंचायतच्या इतिहासातील अविश्वास ठरावाची पहिलीच घटना
कसबा बीड/ प्रतिनिधी
ग्रामपंचायतीची गोपनीय माहीती सोशल मीडीयावर टाकल्याने गावामध्ये तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे कारण देऊन उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर करण्याचा अजब प्रकार करवीर तालुक्यातील महे ग्रामपंचायतमध्ये घडला आहे. हा ठराव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रूपाली युवराज बोराटे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असून महे ग्रामपंचायतच्या इतिहासातील अविश्वास ठरावाची पहिलीच घटना घडली आहे.
अधिक माहितीनुसार महे गावच्य़ा उपसरपंच रूपाली बोराटे यांचे विरोधात 25/05 /2023 रोजी करवीर तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यासंबंधी चर्चा व मतदान करण्यासाठी आज 31/05/2023 रोजी करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. या सभेला 11 पैकी 10 सदस्य उपस्थित राहिले. दुपारी 12.00 वाजता उपसरपंच बोराटे यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावाची पडताळणी करण्यात आली.
यावेळी सरपंच सज्जन तुकाराम पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांची निवड होऊन 2 वर्षे झालेली आहे. ग्रामपंचायतमधील माहिती सोशल मीडियावर टाकून गावामध्ये वादाचे प्रसंग होत आहेत. उपसरपंच व त्यांचे पती गावातील लोकांना माहिती अधिकार अंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी सांगत आहेत, असे आपले म्हणणे मांडले. तर रुपाली बोराटे यांच्या विरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव योग्य असून तो संमत व्हावा, असे शामराव आकाराम कुंभार ,हणमंत बाजीराव पाटील , कृष्णात सखाराम कांबळे ,काजल सचिन बोराटे , मनीषा बुद्धिराज पाटील, सुवर्णा सचिन पाटील, सविता सुधाकर कांबळे या सदस्यांनी मत मांडले.
पंचासमोर आपली बाजू मांडताना उपसरपंच बोराटे यांनी म्हटले आहे कि, “2021साली बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड झालेली होती. गावातील लोकांची सोय व्हावी, यासाठी मी योग्य ते प्रयत्न केले. मी मासिक सभेस गैरहजर असते हा आरोप मला मान्य नाही. फक्त राजकीय हेतूने एक महिला म्हणून आपल्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. तसेच 25/5/2023 पोट निवडणुकीमध्ये नवीन निवडून आलेले कृष्णात सखाराम कांबळे यांना मी केलेल्या कोणत्याही कामाबद्दल त्यांना काहीच माहिती नाही, तरीसुद्धा त्यांनी अविश्वास प्रस्तावावर सही केलेली आहे” अशी आपली बाजू मांडली.
त्यानंतर अविश्वास ठराव मतदानासाठी हात वर करून मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली व अविश्वास ठरावावर मतदान करणे सांगितले. त्यावेळी उपस्थित 10 पैकी 9 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध एका सदस्यांनी मतदान केले. एकूण 11 सदस्य संख्यापैकी किमान 9 मताची आवश्यकता होती. ती मते अविश्वास ठरावाच्या बाजूने संमत झाल्याने ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 35(3) आणि सरपंच व उपसरपंच यांचे विरुद्ध प्रस्ताव नियम 1975 अन्वये अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार यांनी घोषित केले. या सभेचे कामकाज 1 वाजून 10 मिनिटांनी संपले.
ही अविश्वास ठराव सभा करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सरपंच सज्जन तुकाराम पाटील यांनी मांडला. या ठरावास ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव दिनकर जरग यांनी अनुमोदन दिले. या अविश्वास ठराव सभेसाठी मंडल अधिकारी प्रवीण माने, महसुली लिपिक प्रवीण भोसले, महे ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी तब्बसुम जावेद अत्तार, तलाठी शुभांगी डोंगरे ,पोलीस पाटील इंदुमती हुजरे, करवीर पोलीस प्रशासन हेड कॉन्स्टेबल विजय गुरव व सुभाष कांबळे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.