राष्ट्रीय सर्वेक्षणाची नोंद
प्रतिनिधी /मडगाव
स्वतःच्या मालकीचा मोबाईल फोन वापरण्यामध्ये देशभरात गोव्यात महिला आघाडीवर आहेत. गोव्यातील तब्बल 91 टक्के महिलांकडे स्वतःचा मोबाईल फोन असून त्यानंतर सिक्कीममध्ये 89 टक्के महिलांकडे स्वतःचा फोन असल्याची नोंदणी राष्ट्रीय सर्वेक्षणात करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण 2019-20 या सालात करण्यात आले होते. या सर्वेक्षणात गोव्यासह देशभरातील लोकांची मते जाणून घेण्यात आली होती.
मद्यप्राशनात गोवा आघाडीवर
गोव्यात दारू अर्थात मद्य अगदी सहजरित्या उपलब्ध होत आहे. साहजिकच छोटा गोवा मद्यप्राशनात अग्रेसर असल्याची नोंद राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात करण्यात आली आहे. गोव्यात सर्वाधिक 59 टक्के पुरुष मद्यप्राशन करतात. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो अरूणाचल प्रदेशाचा. या ठिकाणी 57 टक्के पुरूष मद्यप्राशन करतात. तिसऱया स्थानावर तेलंगण असून या ठिकाणी 50 टक्के पुरूष मद्यप्राशन करीत असल्याचे राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात आढळून आले आहे. सर्वात कमी मद्यप्राशन लक्षद्वीपमध्ये केले जात असून ते केवळ 1 टक्काच आहे.
गोव्यात 21.3 टक्के महिलांचा छळ
याच सर्वेक्षणात गोव्यातील 21.3 टक्के महिलांनी आतापर्यंत शारीरिक किंवा लैंगिक छळाचा सामना केला असल्याचे नमूद केले आहे. 18 ते 49 वयोगटालीत 10 टक्के महिलांनी नवऱयाकडून होणारा त्रास सहन केला आहे.