जलवाहिनीच्या खोदाईमुळे रस्ता बंद, वाहनधारकांची अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी बसवणकोळ्ळ जलशुद्धीकरण केंद्रापासून जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कणबर्गी रोडचा एका बाजुचा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. यापूर्वी नंदीनी डेअरीपासून कणबर्गीपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. पण कित्येक महिन्यापासून हा रस्ता बंद असल्याने वाहनधारकांसाठी अडथळ्याची शर्यत निर्माण झाली आहे.
पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्याकरीता खोदाईचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध भागातील जलकुंभांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने मोठ्या आकाराच्या जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. याकरिता कणबर्गी रोडच्या एका बाजुचा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. नंदीनी डेअरीपासून कणबर्गीपर्यंतच्या रस्त्यावर खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. त्याचप्रमाणे आता महांतेशनगरपासून जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणेच वाहतुकीस बंद ठेवला आहे.
या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पण कित्येक महिन्यापासून हा रस्ता बंद असल्याने एका बाजुच्या रस्त्यावरूनच वाहनधारकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जलवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण सदर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अद्यापही अर्धवट आहे.
पावसाळ्यात जलवाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पण 6 महिन्यापासून हे काम सुरू असल्याने हा रस्ता बंद आहे. वाहनधारकांना अडथळ्यांच्या शर्यतींना तोंड द्यावे लागत आहे. येथील रहिवाशांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असून, रस्ता बंद असल्याने व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील कामे वेळेत पूर्ण करून रस्त्याची दुरूस्ती करावी आणि रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी होत आहे.