वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्यंतरी इलेक्ट्रिक दुचाकींना लागलेल्या आगीमुळे ग्राहकांनी सद्यपरिस्थितीमध्ये या प्रकारातील दुचाकी खरेदी लांबणीवर टाकली असल्याने याचा परिणाम विविध कंपन्यांच्या विक्रीवर जूनमध्ये दिसून आला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीमध्ये ओला इलेक्ट्रिक चौथ्या स्थानी घसरली आहे.
ग्राहकांना गाडी वितरीत करण्यामध्ये होणार उशीर काहीसा ग्राहकांना पसंत पडलेला नाही, असेही एका पाहणीत दिसून आले आहे. जून 30 अखेर ओला इलेक्ट्रिकच्या 5 हजार 869 इलेक्ट्रिक स्कूटर्सची नोंदणी झाली आहे. यामध्ये आघाडी घेतली आहे ती ओकिनावा ऑटो टेक यांनी. 6967 वाहनांची विक्री करत ओकिनावाने आघाडी घेतली आहे. यांच्या पाठोपाठ ऍम्पियर व्हेईकल प्रा. लि. यांनी 6534 आणि हिरो इलेक्ट्रिक यांनी 6486 वाहनांची विक्री करत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले आहे. ऍथर एनर्जीने 3797 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली आहे.
एप्रिलपर्यंत ओलाच होती आघाडीवर
एप्रिलपर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीमध्ये ओला हीच आघाडीवरची कंपनी राहिली होती. पण आता ही कंपनी या स्पर्धेमध्ये मागे पडताना दिसते आहे. जूनमध्ये ओलाच्या नोंदणीमध्ये 30 टक्के इतकी घसरण नोंदली गेली आहे.