पुणे / प्रतिनिधी :
गोव्यातील दोघा बहिणींनी ऑनलाईन जुगार खेळण्यास बोलावून फसवणूक केल्याने निराश झालेल्या 50 वर्षीय इसमाने पुण्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोवा येथील दोन जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विकास शिवाजी टिंगरे (वय 50, रा. धानोरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अप्रिता दास (वय 35) व तिची बहीण सुष्मिता दास (33, दोघे रा.. गोवा) यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टिंगरे यांचा मुलगा दुर्गेश विकास टिंगरे (वय 21, रा. धानोरी, पुणे) याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2018 ते 23 मे 2023 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी संगनमत करुन विकास टिंगरे यांना वारंवार फोन करून गोवा येथे ऑनलाईन जुगार तसेच केसोनो जुगार खेळण्यासाठी बोलावले व जुगार खेळण्यास भाग पाडले. पैसे जिंकले असता त्यांना कॅश आऊट होऊ दिले नाही. त्यानंतर ते पैसे जुगारात हरल्यानंतर जुगारात फसवल्याने ते निराश झाले व त्यांनी 23 मे 2023 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. साळवी करत आहेत.
पोलिसांना मिळाली चिठ्ठी
मयत विकास टिंगरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की ऑनलाईन जुगारातून गोवा येथील दास भगिनींशी त्यांची झालेली होती. त्यातून सदर दोघींनी त्यांना गोवा येथे जुगार खेळण्यास बोलावले होते. मला जुगाराचे व्यसन होते आणि त्याचा गैरफायदा घेत दास भगिनींनी मला फसवले आहे. सदर नैराश्यातून मी आत्महत्या करत असल्याचे सांगण्यात आले आहे.