हिजाबशिवाय छायचित्र केले होते पोस्ट
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणमध्ये तीन महिन्यांपासून हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. याचदरम्यान पोलिसांनी ऑस्करविजेती अभिनेत्री तारानेह अलीदूस्तीला अटक केली आहे. निदर्शकांना मृत्युदंड ठोठावल्याप्रकरणी तिने सरकारवर सडकून टीका केली होती. अलीदूस्तीनेने इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र पोस्ट केले होते, यात तिने हिजाब परिधान केला नव्हता. अभिनेत्रीने मोहसिन शेखरीला मृत्युदंड ठोठावण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता.
9 डिसेंबर रोजी मोहसिन शेखरी नावाच्या युवकाला इराणच्या न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला होता. याच्या विरोधात तारानेहने इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. आंतरराष्ट्रीय संघटना हा रक्तपात पाहत आहेत, परंतु कुठलीच कारवाई करत नाहीत. हा प्रकार मानवतेला लज्जास्पद असल्याचे तारानेहने म्हटले होते. मोहसिन शेखरीला सुरक्षा दलाच्या एका सदस्यावर चाकूने हल्ला करणे आणि तेहरानमध्ये रस्त्यावरील वाहतूक रोखण्याच्या आरोपासाठी मृत्युदंड देण्यात आला आहे.
तारानेहने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक छायचित्र शेअर केले असून यात तिने एक कागद हातात धरल्याचे दिसून येते. या कागदावर ‘महिला, जीवन, स्वातंत्र्य’ असे नमूद आहे. हा नारा इराणच्या महिला सरकारच्या विरोधात वापरत आहेत. मोहसिन हा निर्दोष होता तरीही त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आल्याचे तारानेहने म्हटले होते.
अलीदूस्ती प्रख्यात अभिनेत्री
अलीदूस्तीचे वडिल हामिद अलीदूस्ती हे इराणच्या फुटबॉल संघाचे सदस्य राहिले आहेत. तसेच विदेशी संघासाठी खेळणारे ते पहिले इराणी फूटबॉलपटू होत. तर तारानेहने वयाच्या 17 व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिला स्वतःच्या पहिल्या चित्रपटासाठी 2022 मध्ये लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ब्रॉन्ज लेपर्ड पुरस्कार मिळाला होता. तिने आतापर्यंत 17 चित्रपट केले असून 8 पुरस्कार तिला मिळाले आहेत. ‘द सेल्समॅन’ चित्रपटाने 2016 मध्ये ऑस्कर पटकाविला होता. यात अलीदूस्तीनेही अभिनय केला होता.
मागील महिन्यात 2 अभिनेत्रींना अटक
21 नोव्हेंबर रोजी इराणमध्ये पोलिसांनी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना अटक केली हाहेती. दोघीही इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांना पाठिंबा दर्शवित होत्या. हेंगामेह गजियानी आणि कातायुन रियाही यांच्यावर इराणमध्ये कारवाई करण्यात आली आहे. हेंगामेह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी हिजाब परिधान केला नव्हता.