दिल्ली पोलिसांनी चीन-हाँगकाँगच्या हॅकर्सची माहिती मागितली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली एम्सच्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यात चीनचा हात होता याची पुष्टी केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली होती. आता याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सीबीआयला पत्र लिहून इंटरपोलद्वारे चीन आणि हाँगकाँगच्या हॅकर्सची माहिती मागविली आहे. हॅकर्सकडून मेल करण्यात आलेल्या आयपी ऍड्रेसची माहिती मागविल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
हे आयपी ऍड्रेस कुणाला देण्यात आले, याचा वापर कुठली कंपनी करतेय किंवा कुठलाही व्यक्ती यात सामील आहे का अशी विचारणा पत्राद्वारे करण्यात आली आहे. इंटरपोलशी संपर्क साधण्यासाठी सीबीआय ही नोडल एजेन्सी असल्यानेच याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली आहे.
एम्सच्या सर्व्हरवर चिनी हॅकर्सनी हल्ला केला होता. एम्सच्या 100 पैकी 5 सर्व्हर्सना हॅक करण्यात आले होते, या सर्वांचा डाटा रिकव्हर करण्यात आला आहे, तर ओपीडी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाल्याचे सरकारने सांगितले होते.
सायबर हल्ल्यामागे दोन चिनी ग्रूप
सायबर तज्ञांनुसार चीनचे दोन रॅन्समवेअर ग्रूप सम्राट ड्रगनफ्लाय आणि ब्रॉन्ज स्टारलाइट या सायबर हल्ल्यामागे असू शकतात. तर लाइफ नावाच्या एका ग्रूपवरही संशय असून त्याला वानारेन नावाच्या रॅन्समवेअरचे नवे व्हर्जन मानले जात आहे. हॅकर्सनी विक्रीसाठी डाटा डार्कवेबवर अपलोड करण्यास सुरुवात केलेली असू शकते, कारण हॅकर्सच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नव्हत्या असे तपासातून समोर आले आहे. डार्क वेब इंटरनेट सर्चिंगचाच हिस्सा असला तरीही याला सामान्य स्वरुपात सर्च इंजिनवर शोधता येत नाही. अशाप्रकारची साइट उघडण्यासाठी स्पेशल ब्राउजरची गरज भासते, ज्याला टॉर म्हटले जाते. डार्क वेबच्या साइटला टॉर एन्क्रिप्शन टूलच्या मदतीने लपविले जाते. अशा स्थितीत कुठलाही युजर्स त्यांच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचल्यास त्याचा डाटा चोरी होण्याचा धोका असतो.
200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
एम्स दिल्लीचा सर्व्हर हॅक करणाऱयांनी 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. हॅकर्सनी पेमेंट क्रिप्टोरन्सीत करण्याची सूचना केली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी कुठल्याही प्रकारची खंडणी मागितली गेली नसल्याचा दावा केला होता.