युवराज पाटील /सांबरा
श्री पंतनामाचा अखंड गजर व श्रीपंत भक्तीत तल्लीन झालेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी श्रीपंत महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. पालखी सोहळा व पालखी सेवेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावल्याने पंतबाळेकुंद्री परिसर भाविकांनी फुलून गेला.
प्रारंभी पहाटे 5 वाजता आमराईमध्ये पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला. भाविकांनी श्रीपंतांचे स्मरण केले. त्यानंतर गावातील पंतवाडय़ातून श्रींची उत्सवमूर्ती चांदीच्या पालखीत ठेवून श्रीपंत महाराजांच्या पालखी सोहळय़ाला प्रारंभ करण्यात आला.
या पालखी सोहळय़ात पारंपरिक लवाजम्यासह हजारो पंतभक्त सहभागी झाले होते. पंत भक्तांकडून अखंड भजन सेवा व श्रीपंत नामाचा गजर करण्यात येत होता. या पालखी सोहळय़ात कोल्हापूर, गडहिंग्लज, नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, सांगली, सातारा, भुदरगड, गारगोटी, निपाणी, खानापूर, बेळगावसह परिसरातील भाविक सहभागी झाले होते. अखंड भजन सेवा व पंतनामामुळे अवघी पंतबाळेकुंद्री दुमदुमून गेली होती. बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने दिवसभर भाविकांचे लोंढे बाळेकुंद्रीत दाखल होत होते.
पालखी चावडीसमोर आल्यानंतर ग्राम पंचायतीच्यावतीने स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत करण्यात येत होते. दुपारी 2 वाजता पालखी बालमुकुंद निवास येथे आल्यानंतर पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी आमराईत मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली. मुख्य मंदिरात श्रींच्या उत्सवमूर्तीची स्थापना केली. रात्री 8 ते 12 या वेळेत श्रींची पालखी सेवा पार पडली. यावेळी श्रींची पालखी घेऊन मंदिराला तीन प्रदक्षिणा घातल्या. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.
आज यात्रेची सांगता
गुरुवार दि. 13 रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसाद होईल. दुपारी 3 वाजता श्रीपंत महाराजांच्या श्रीदत्त प्रेमलहरी या भजन गाथेतील पदावर आधारित प्रेमानंद टिपरी कार्यक्रम पार पडेल.