चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर 90 पैसे सेस (अधिभार) लावला आहे. सत्तेत आल्यानंतर आम आदमी पार्टी (आप) सरकारने जनतेवर लादलेला हा पहिला कर आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय इलेक्ट्रिकल व्हेईकल धोरण आणि नवीन उद्योग धोरणाला मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मान्यता दिली आहे.
पंजाबमध्ये यापूर्वी 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले होते. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट हटवत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 10 रुपये आणि 5 रुपये प्रतिलिटरने स्वस्त केले होते. आता पंजाबमधील भगवंत मान सरकारकडे सध्या पैशांचा तुटवडा जाणवत असल्याने इंधन दरवाढ करणे क्रमप्राप्त झाले आहे.
औद्योगिक धोरणालाही मान्यता
शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बहुप्रतिक्षित औद्योगिक धोरणालाही मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या 23-24 फेब्रुवारीला प्रस्तावित गुंतवणूकदार समिट लक्षात घेता या धोरणाला मंजुरी देणे महत्त्वाचे मानले जात होते. राज्य सरकार या धोरणाच्या माध्यमातून 5 लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्याचा विचार करत आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धोरण औद्योगिक ग्राहकांना वीजदर कमी करण्यावर जोर देत आहे. त्यानुसार आता 25 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना जिल्हास्तरावर मंजुरी दिली जाऊ शकते.