आराखडा तयार, लवकरच एमआयडीसीकडे देणार; केएमटीचे वर्कशॉप शेडही प्रस्तावित
विनोद सावंत कोल्हापूर
शिरोली एमआयडीसी (महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ) येथील दोन भूखंड वाचविण्यासाठी केएमटी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. या ठिकाणी सीएनजी पेट्रोल पंप, ई चार्जींग सेंटरसह केएमटीचे शेड उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात आराखडाही केला असून लवकरच एमआयडीसीकडे दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कोल्हापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या (केएमटी) एकूण 13 मिळकती आहेत. त्यापैकी शिरोली एमआयडीसीमध्ये क्रमांक डी 20 वर के.एम.टी. बसस्थानकासाठी 2156 चौ. मी. ची एक भूखंड व दुसरा भूखंड 14133 चौ. मी. इतका आहे. महापालिकेतील तत्कालिन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केएमटीला उत्पन्न मिळून देण्यासाठी 1993 मध्ये एमआयडीसीतील दोन मिळकती घेतल्या होत्या. या मिळकती विकसित अथवा वापरात आणलेल्या नाहीत. भूखंड घेतल्यापासून तीन वर्षात त्याचा वापर झाला नाही तर एमआयडीसी दिलेला भूखंड परत घेते. 30 वर्ष होवून केएमटीने या भुखंडचा वापर केलेला नाही.
त्यामुळे एमआयडीसीने 26 एप्रिल रोजी भूखंड ताब्यात घेत असल्याचे पत्र केएमटीला दिले होते. दरम्यान, 1 मे रोजी पालकमंत्री दीपक केसरकर ई गर्व्हनन्स सिस्टीमच्या उद्घाटनावेळी शिवाजी मार्केट येथील मनपा कार्यालयात आले होते. तत्कालिन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्यांच्यासमोर केएमटीच्या भुखंडांचा विषय उपस्थित केला. केएमटीची आर्थिक स्थिती आणि भूखंड विकसित करण्यासाठी आलेल्या अडचणी सांगितल्या. पालकमंत्री केसरकर यांनी ताबडतोब उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरून संवाद साधून केएमटीला मुदत वाढ देण्यास सांगितले. मंत्री सामंत यांनीही याबाबत केएमटीला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यानंतर केएमटीचे प्रभारी परिवहन व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, अभियंता यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भुखंडाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहितीचा आराखडा लवकरच दिला जाईल, अशी ग्वाही दिली. यानंतर केएमटी प्रशासनाने आराखडा तयार केला असून त्याची स्कुटनी केली जात आहे. लवकरच हा आराखडा एमआयडीसीला देवून भुखंडवर मालकी कायम ठेवली जाणार आहे. महामार्गालगत हा भूखंड असल्याने येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्या दृष्टीने प्रकल्प सुरू करण्याचे नियोजित आहे.
एमआयडीसीतील भुखंडावर प्रस्तावित प्रमुख प्रकल्प
सीएनजी पेट्रोल पंप
रेग्युलर पेट्रोल पंप
ई चार्जिंग स्टेशन
केएमटीसाठी वर्कशॉप शेड
भूखंड विकसित करण्यासाठी 3 कोटींची तरतूद
एमआयडीसी येथील दोन्ही भुखंडाचा परिसर मोठा आहे. येथील भूखंड विकसित करण्यासाठी निधीची आवश्यकता लागणार असल्याने मनपाच्या बजेटमध्ये 3 कोटींची तरतूद केली आहे. या निधीतून येथे चार्जिंग सेंटर, पेट्रोल पंप उभारणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
20 कोटींचा भूखंड
केएमटीचे दोन्ही भूखंड एमआयडीसीमध्ये मोक्याच्या ठिकाणी आहेत. सद्याच्या बाजारभावाने या दोन्ही भुखंडाची किम्मत 20 कोटींहून अधिक होते. त्यामुळे केएमटीला हा भूखंड गमाविणे तोट्याचे ठरले असते.
तोट्यात असणाऱ्या केएमटीला मिळणार आर्थिक हातभार
दोन्ही भुखंडावर प्रस्ताविक पेट्रोल पंपासह इतर प्रकल्प सुरू झाल्यास केएमटीला उत्पन्न सुरू होणार आहे. सद्या केएमटीची आर्थिक स्थिती बेताची आहे. कर्मचाऱ्यांचे पगार मनपाचे अनुदान मिळाल्यानंतरच होतात. दोन्ही भूखंड विकसीत केले तर तोट्यात असणाऱ्या केएमटीला काही अंशी आर्थिक हातभार लागणार आहे. यासाठी केएमटी प्रशासनाने पाठपुरावा सुरूच ठेवावा लागणार आहे.