प्रतिनिधी /बेळगाव
वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव आयोजित बालगंधर्व पुण्यतिथीनिमित्त संगीताचा बहारदार ‘नाटय़ गीतांजली’ कार्यक्रम आयएमईआर सभागृहात पार पडला. मुंबई येथील गायक धनंजय म्हस्कर यांनी अप्रतिम नाटय़ संगीत सादर करीत उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. संगीत शाकुंतल ते बालगंधर्व चित्रपटापर्यंत नाटय़ संगीताचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडण्यात आला.
यामध्ये शाकुंतल नाटकातील पंचतुंड नर रुंड माळ, वहिनी नाटकातील ‘पाखरा जा’, मत्स्यगंधामधील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ तर सोबतमधील ‘प्रिये पहा’ यासह अनेक नाटय़गीते धनंजय यांनी सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल याळगी यांच्या हस्ते बालगंधर्वांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कलाकारांचा परिचय नीता कुलकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन स्वाती कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमात तबला साथ अंगद देसाई व संवादिनी साथ रवींद्र माने यांनी केली. या कार्यक्रमात रणजीत चौगुले यांना साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ध्वनी व प्रकाश संयोजन गुरु पेडणेकर यांचे होते. माधव कुंटे यांनी आभार मानले.