खैबर पख्तुनख्वामध्ये गोळीबार, 4 पोलीस ठार
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी पोलिओ लसीकरण पथकावर गोळीबार केल्यामुळे पोलिओ टीमच्या सुरक्षेवर तैनात असलेले 4 पोलीस हुतात्मा झाले असून दोघे जखमी झाले. टँक जिह्यातील गुल इमान भागात ही घटना घडल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. कडक पोलीस बंदोबस्तात घरोघरी पोलिओ लसीकरण सुरू असताना हल्लेखोरांनी पोलीस व्हॅनवर गोळीबार केला. या संघर्षात सर्व अधिकारी आणि आरोग्यसेवक सुरक्षित असले तरी पोलिसांना प्राण गमवावे लागले. पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये बराच वेळ गोळीबार सुरू होता असे स्थानिकांनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
पाकिस्तानातील अनेक भागात लोकांकडून पोलिओविरोधी लसीकरणाला सातत्याने विरोध केला जातो. पोलिओ डोसच्या थेंबांमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते असा समज लोकांमध्ये आहे. ही मोहीम लोकांच्या सुरक्षेसाठी असल्याचे सरकार जनतेला समजावून सांगत असले तरी लोकांच्या मानसिकतेत अद्यात फरक पडलेला दिसून येत नाही.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पोलिओ लसीकरण पथकावर हल्ले वाढले आहेत. यापूर्वी 28 जून रोजी पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिह्यात पोलिओविरोधी लसीकरण पथकावरही हल्ला झाला होता. या संघर्षात दोन पोलिसांसह तीन जण ठार झाले होते. 30 जुलै रोजी पेशावर जिह्यातील दौदझई भागात पोलिओ पथकाचे रक्षण करणाऱया बंदुकधारी पोलीस हवालदारावर गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी वायव्य पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात पोलिओ कर्मचाऱयांच्या पथकाचे रक्षण करणाऱया एका पालीस अधिकाऱयाची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर, 15 ऑगस्ट रोजी खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिओ टीमच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन पोलिसांना गोळय़ा घालण्यात आल्या होत्या.