क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
एफसी गोवाने आपला मीडफिल्डर प्रिन्सटन रिबेलोचा करार आणखी दोन वर्षांनी वाढवला आहे. त्यामुळे तो 2024 हंगामापर्यंत ऑरेंज जर्सीमध्ये खेळताना दिसेल. एफसी गोवाचे आयाएसएलमध्ये प्रतिनिधीत्व करताना तो एफसी गोवासाठी 17 सामने खेळला होता.
‘आगामी दोन वर्षांसाठी करारात वाढ झाल्याने मी निश्चितच आनंदी आहे आणि माझ्या कुटूंबियासाठीही हा आनंदाचा क्षण आहे. मागील दोन हंगाम माझ्यासाठी स्वप्नवत होते. मी सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी सर्वतोपरी योगदान दिले तरी क्लबसाठी अजूनही खुप काही देणे शिल्लक आहे असे मला वाटते’ असे एफसी गोवाशी करार केल्यानंतर प्रिन्सटन रिबेलो म्हणाला.
‘एफसी गोवा व्यवस्थापनाने करारात वाढ करताना माझ्यावर विश्वास दाखवल्याने माझीही जबाबदारी वाढली आहे. पुढील हंगामामध्ये कठोर मेहनत घेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य मी ठेवले आहे, असे 23 वर्षीय प्रिन्सटन फर्नांडिस म्हणाला. प्रिन्सटनच्या करारात वाढ केल्याबद्दल एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुष्कर यांनीही आंनद व्यक्त केला.
‘प्रिन्सटन हा मेहनती आणि कायम शिकण्यास उत्सुक असलेला खेळाडू आहे. केवळ क्लबच नव्हे ते देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. मागील आयएसएल मोसमात त्याने चांगला खेळ केला. मागील अनुभवाच्या जोरावर आगामी हंगामात तो क्लबसाठी महत्वपूर्ण खेळाडू ठरेल’ असा विश्वास रवी पुष्कर यांनी व्यक्त केला.
एफसी गोवाने कायम नवोदित आणि प्रतिभावंत खेळाडूंवर लक्ष्य केंद्रित करून त्यांना क्लबमध्ये सामावून घेण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. 2017 मध्ये प्रिन्सटन रिबेलो एफसी गोवात आला. 2018-19 मध्ये गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाचा तो प्रमुख खेळाडू होता. 2019 मध्ये डय़ुरँड कप स्पर्धेत एफसी गोवासाठीच्या सर्वोत्कृष्ट योगदानांनंतर त्याच वर्षी प्रिन्सटनचे आयएसएलमध्ये पदार्पण झाले होते.