कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन
कोल्हापूर प्रतिनिधी
कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, महाराष्ट्र वेतन कोड 2019 त्वरित लागू करावे, यासह विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली.
दुपारी दसरा चौक येथून महासंघाचे ज्येष्ठ नेते जयंत देशपांडे, प्रदेश उपाध्यक्षा ऍड. अनुजा धरणगावकर, जिल्हाध्यक्ष एस.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्याचे निवेदन त्यांना सादर केले.
निवेदनातील मागण्या अशा, महाराष्ट्रात सामाजिक सुरक्षा कोड 2020 त्वरित लागू करण्यात यावे, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाचे कामकाज सुरु करावे, अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर्स यांना किमान वेतन लागू करावे, बांधकाम कामगारांच्या प्रलंबित आर्थिक लाभांची पुर्तता करावी, बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभ वाटप पारदर्शकपणे व्हावा, असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम अभियान राबवावे, कामगार सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत कामगार कल्याण बोर्डाची स्थापना लवकर करावी, सर्व शासकिय कामगार कार्यालयात रिक्त पदे त्वरित भरावीत.
आंदोलनात कार्याध्यक्ष शिवाजी चौगुले, कोषाध्यक्ष अमृत लोहार, अभिजीत केकरे, दादासो पाटील, तेजस मडिवाल, रवींद्र एडके, दिलीप मेडसिंगे, राहुल भालबर, मुकुंद जोशी, भगवान खाडे, अरुण नागराळे, संदीप पाटील, रमेश थोरात, विदुला पाटील, युनुस शेख, प्रशांत कांबळे, दादासो पाटील, अमर लोहार आदी सहभागी झाले होते.